Friday, December 27, 2019

चतुर व्यापारी

वाचकांना सांगू इच्छितो की,"चतुर व्यापारी"ही एक विनोदात्मक लघुकथा/बोधकथा वाटत असली तरी पैशाच्या लोभापायी अथवा लवकर श्रीमंत होण्याच्या नादात भ्रमिष्ट झालेल्या समाजाचे ही कथा प्रतिनिधित्व करते.स्वतःचे मन व बुद्धीने सारासार विचार न करता दुसर्‍यावर विश्वास ठेवणे किती घातक असते,हे या कथेतून आपल्याला पाहावयास मिळणार आहे.लेख लिहिता लिहिता ध्येय तेच फक्त मार्ग वेगळा,या हेतूने ही लघुकथा आपल्यासमोर मांडत आहे.

काही वर्षापूर्वी वाकडवाडी नावाच्या गावातील शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह भागवत असे.सर्व गाव अगदी सुखासमाधानाने,गुण्यागोविंदानं शेतीवाडीची कामे करत.एके दिवशी एक व्यापारी या गावांमध्ये आला आणि गावकऱ्यांना सांगू लागला,शेतीची कष्टाची कामे करून कुठवर तुम्ही जगणार,एवढे काबाडकष्ट करायचे आणि हाती शेवटी काय मिळतं तुमच्या,तर भोपळा,मी तुमच्यासाठी खूप सोपा आणि भरगच्च पैसे मिळवून देणारा उद्योग आणला आहे.आपण फक्त सर्वांनी मिळून गावच्या परिसरात असलेले माकड पकडायचे आणि प्रत्येक माकडाचे 500 रुपये माझ्याकडून घेऊन जायचे.सर्व लोक आनंदी झाले.फार सोपा उद्योग आहे.माकडाला एखादी भाकरी टाकली की,ती जवळ येणार आणि आपण त्यांना पकडणार.म्हणतात ना पैशाचा मोह आवरत नाही.तसे सर्वांनी होकार दर्शवून आपली तयारी दाखवली.सर्व गावकरी मंडळी जोमाने कामाला लागली."टाक भाकर आणि धर माकड"चळवळ सुरू झाली.प्रत्येकाच्या डोळ्यासमोर 500 ची नोट लखलख चमकू लागली.किती सोपे आहे,माकड आणायचे आणि 500 रुपये घेऊन जायचे.लगेच सर्व लोक माकडं धरुन आणू लागली व ते व्यापाऱ्याला देऊन 500 रुपये घेऊन जाऊ लागली."फुकटचं घावलं अन बापलेक धावलं"अशी गत झाली लोकांची.
काही दिवसातच गावातील माकडांची संख्या हळूहळू कमी झाली व माकडं मिळणे दुर्मिळ होऊ लागले.गावातील लोक चर्चा करू लागली,की आता माकडं मिळत नाहीत आणि कामही नाही,त्याकरिता आपण पुन्हा शेतीची कामे सुरु करू,परंतु व्यापारी चतुर होता त्याने लोकांना सांगितले,500 ऐवजी मी आता तुम्हाला 700 रुपये द्यायला तयार आहे.गावात नाही परंतु बाहेरगावी माकडं असतील तरी धरून आणा.लोक पुन्हा व्यापाऱ्याच्या आमिषाला बळी पडली व बाहेरच्या,शेजारच्या गावातील माकडे धरून आणू लागले आणि व्यापाऱ्याला विकून 700 रुपये मिळू लागली.म्हणून सर्वच गावकरी जोमात होती.आपल्या मदमस्त पैशाच्या धुंदीत धूंद होऊन गेले होते,कुणीही व्यापाऱ्याला विचारले नाही की,आपण या माकडांचे काय करता,आपल्याला यांचा काय उपयोग.प्रत्येकजण पैशाच्या जीवावर जीवनारुपी स्वप्नात रंग भरत होता,परंतु रंगवलेली स्वप्न काही दिवसातच भंग पावली. कालांतराने बाहेरगावचेही माकडं संपुष्टात आली.आता काय करावे या विचाराने लोक चिंतातुर झाले.हतबल होऊन लोक पुन्हा शेतीकडे वळू लागली.चतुर व्यापाऱ्याने जाणले की,आता खरोखरच सर्व माकडं संपली आहेत,जी आहेत ती माझ्याकडेच आहेत.त्याने युक्ती लढवली दुसऱ्या एका व्यापाऱ्याला त्या गावात बोलावले व मी माकड खरेदीसाठी आलो आहे,असे लोकांना सांगावयास सांगितले.दुसऱ्या व्यापाऱ्याने गावात दवंडी पिटवली की,मी दीड हजार रुपयाला एक माकड घेण्यास तयार आहे.तुमच्याकडे असतील तेवढी माकडं धरुन ठेवा.उद्या सकाळी आठ वाजता मी माकडं घेण्यास सुरू करणार आहे,जो अगोदर येईल त्याला चांगला मोबदला मिळणार आहे.लवकर लवकर माकडं आणून श्रीमंत व्हा.लोकांना आता नवलच वाटू लागले.लोकांना पुरेपूर माहित होते,की आता बाहेर तर माकडं नाहीत,जी आहेत ती पहिल्या व्यापाऱ्याकडेच आहेत.म्हणून लोक पुन्हा पहिल्या व्यापाऱ्याकडे गेले व त्याला म्हणाले आम्हाला माकडं हवी आहेत.तो म्हणाला काही हरकत नाही,मी तुम्हाला 1000 रुपयाला एक माकड द्यायला तयार आहे.सर्व गावकऱ्यांनी हजार-हजार रुपयाला पहिल्या व्यापाऱ्यांकडून माकडं विकत घेतली व दुसऱ्या व्यापाऱ्याला विकण्यासाठी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मंदिरातल्याप्रमाणे रांगा लावून बसली,परंतु दोन्ही व्यापाऱ्यांनी रातोरात तेथून पळ काढला होता.दुसऱ्या दिवशी सकाळी तेथे व्यापारी नव्हे तर,फक्त शिल्लक होती त्याची खोटी आश्वासने.सर्व लोकांना कळून चुकले होते की,आपल्याला व्यापाऱ्याने फसवले आहे,त्याने आपलीच माकडं,आपल्यालाच कामाला लावले आणि परत आपल्यालाच विकले आणि स्वतः मात्र मालामाल होऊन पसार झाला.ह्या कल्पक बुद्धिमत्तेचा लोकांना चमत्कारच नव्हे,तर विजेसमान धक्का बसला होता. लोक पुतळ्यागत स्तब्ध राहुन शून्य नजरेतून एकमेकांकडे पाहत होती.
एखादा व्यक्ती कुठलेही कार्य करताना त्याचा हेतू काय आहे,हे नक्कीच जाणून घेतलं पाहिजे.आता लोक निराशेच्या खाईत ढकलली गेली होती.घायाळ अंतःकरणाने ती सर्व माकडं जंगलामध्ये मोकळी सोडून देऊन लोक शेतीच्या कामाला लागली.जवळ थोडीफार रक्कम होती,तीही व्यापाराने लुटून नेली होती.त्यांची सर्व स्वप्ने दुभंगली होती.आता त्यांना कळाले होते,की श्रीमंत होण्याचा कुठलाही राजमार्ग नसून कष्ट करण्याची तयारी व दूरदृष्टी असणे आवश्यक आहे आणि जो जलद मार्ग स्वीकारतो त्याची लयलूट अथवा अपघात निश्चित आहे.जीवनामध्ये कोणताही माणूस फक्त मेहनत,योग्य नियोजन व बुद्धिमत्तेच्या जीवावरच श्रीमंत होऊ शकतो, हे सर्व गावकऱ्यांना आता खरोखरच पुरते उमजून आले होते.

           लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे (सर)    मु.पो.लोणी(स.),आष्टी
  मो.९४२१३३६०५९

18 comments:

  1. धन्यवाद,सर्व मित्रांना..

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर,अप्रतिम सर👍👍💐💐

    ReplyDelete
  3. Very nice, write this story.congratulations

    ReplyDelete
  4. Very nice article sir. Keep it up and all the every best for your future projects.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...