Wednesday, February 16, 2022

वेळ

               वेळ



   वेळ हा फक्त दोन अक्षरी शब्द, परंतु याचं थोडही मागं-पुढं होणं खूप काही बदलून टाकतं. प्रत्येकाच्या आयुष्याचं गणित बरोबर किंवा चूक हे वेळच ठरवते. अमुक-अमुक वेळी तमुक-तमुक गोष्ट करायलाच हवी हा निसर्ग नियम. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात कुठलाही शहाणपणा नाही. प्रत्येकाच्या आयुष्यातील इयत्ता दहावीचे वर्ष हे महत्वाचे आहे असे सगळ्यांनी सांगून देखील आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याने अपयशाचे धनी झालो तर ती गोष्ट पुन्हा कधीही न भरून येण्यासारखी आहे. वेळ निघून गेल्यानंतर आपण कितीही हळहळ व्यक्त केली तरी झालेल्या गोष्टीमध्ये आपण बदल करू शकत नाहीत हे तितकेच खरे. त्याकरिता गोष्ट घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्याखेरीज पुर्वनियोजन हवे. सर्वकाही वेळेला आणि वेळेनुसार ठरत असते. वेळेच्या बाबतीत जराशी कुचराई देखील फार महागात पडते, परंतु तरीसुद्धा हरेककजण वेळेच्या बाबतीत गाफील का राहतो? हा प्रश्न न उमजणाराच वाटतो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर ह्या-ह्या वेळी गाडी येऊ शकते किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे कुणाचातरी जीव जाऊ शकतो हे माहीत असूनही अनेक कर्मचारी वेळेला लापरवाही करतात. म्हणजे यांना उंटावरचे शहाणे म्हणावे? की आणखी काही हेही उमजत नाही.

     वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ संपली की सर्व संपले. हाजिर तो वजीर. अशा प्रकारचे अनेक वाक्य आपल्या कानावर वेळोवेळी घणाघात करूनही आपण मात्र त्याकडे नजरांदाज करत राहतो. एखादी गोष्ट वेळेत न घडल्याने अवघ्या जीवनाची वाताहत झालेली अनेक उदाहरणे आपण पाहतो. युद्धकाळात काही मिनिटे किंवा सेकंदांचा झालेला उशीर कित्येकांच्या जीवावर बेतला जातो. एखाद्याविषयी बोलताना आपण सहजपणे बोलून जातो, "तो खूप मोठा माणूस आहे" तर अनेकदा असेही म्हणतो, "पैसा खूप मौल्यवान आहे." पण सारासार विचाराने शेवटी या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो, की ना पैसा मोठा, ना माणूस मोठा, मोठी असते ती वेळ. पैशाने दुरावलेला माणूस उद्या जवळ येऊ शकतो तर आपल्या अपरंपार कष्टाने पैसाही मिळू शकतो, परंतु माणूस आणि पैशाची सर्व शक्ती पणाला लावूनही गेलेली वेळ मात्र परत आणू शकत नाही. एवढी वेळेत ताकत आहे. वेळेचे गणित वेळच सोडवू शकते. अन्य कोणीही नाही. काही गोष्टीसाठी वेळ येण्याची वाट पाहावी लागते तर काहींसाठी वेळ जाऊ द्यावी लागते. ठराविक वेळेलाच येणाऱ्या गाडीची वाट पाहत बसावे लागते तर परीक्षेच्या काळात भरभर वेळ जाऊ नये असे सारखे वाटत राहते. माणूस कितीही पुढारला असला तरी वेळेला सलाम करून तिच्यापुढे गुढेगे टेकवतोच. 

       आयुष्यभर आपल्याला सगळेच गुरु मार्गदर्शन करत राहतात. पुरातन काळातील तसेच सद्यस्थितीतील अनेक उदाहरण दाखले देऊन वेळेचे महत्त्व आपल्याला पावलोपावली पटवून देतात. पण त्यांच्या पोटतिडकीने सांगण्याकडे आपण सदैव कानाडोळा करत राहतो. मात्र जेव्हा अनुभवासारख्या महागड्या गुरूनी आपल्या श्रीमुखात चांगली चपराक लावल्यावर आपण त्याला कायम दंडवत घालू लागतो. कारण प्रेमाच्या भाषेपेक्षा कडक शब्दांत केलेली कानउघाडणी भल्याभल्यांना सरळं करते. आपले आई-वडील, शिक्षक, मित्र, आपल्याला वारंवार वेळेचे महत्त्व पटवून देतात. एखादी गोष्ट वेळेवर न केल्याने कशाप्रकारे नुकसान होऊ शकते हे समजावतात. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात लागलेल्या अनुभव ठेचांच्या जखमा ते आपल्याला दाखवत असतात. परंतु त्यांच्यापेक्षा आपण अव्वल असल्याच्या भाबड्या समजुतीपाई अथवा आपल्याला कमीपणा वाटत असल्यामुळे म्हणा, इतर कुठल्या कारणाने आपण आपल्याच मदमस्त चालीत दंग असतो. जेव्हा अनुभव येतो तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. गुरुजी वर्षभर सांगतात, "अरे मुलांनो दहावी-बारावीचे वर्ष म्हणजे जीवनाला कलाटणी देणारे वर्ष आहे आणि त्या वर्षाअखेरचा मुख्यकाळ हा परीक्षेचा असतो. संपूर्ण वर्षभर अभ्यास करायचा, आयुष्याच्या शिदोरीची तुकड्या तुकड्यात बांधणी करायची आणि ऐन तीन तासाच्या पेपरमधले आपले कोलमडून गेलेले नियोजन आपल्या आयुष्याचं वैराण वाळवंट करणारे ठरू शकते." असे वेळोवेळी बजावून देखील परीक्षेच्या वेळी कुणीतरी परिक्षेला उशीरा येणे. पेपर वेळेत न सोडवणे. या गोष्टी घडतातच म्हणजे वर्षभर सांगितलेले सगळे मार्गदर्शन अगदी पालथ्या घड्यावर पाणी पडल्यासारखे वाटते.

         बहुतेक वेळा आपल्या कानावर येते की, "अरे तो खूप अभ्यासू होता. परंतू परीक्षेला येताना त्याच्याकडून थोडा उशीर झाला आणि त्याचा काही पेपर सोडवायचा बाकी राहिला. त्यामुळे तो मिरिटमध्ये येऊ शकला नाही. म्हणजे वर्षभर शाळेची वेळ सांभाळली, अभ्यासाचा वेळ सांभाळली. पण परीक्षेची वेळ मात्र सांभाळता आली नाही. म्हणजे आयुष्यात कधी कधी काही तास, काही मिनिटे हे आपले जीवनमान बदलणारे ठरतात. एखादा पैलवान वर्षानुवर्ष कसरत करून आपलं शरीर बनवत असतो. जेव्हा केव्हा कुस्त्यांच्या आखाड्यात उतरावे लागेल तेव्हा मात्र पूर्ण तयारीनिशी आपले शरीर कसलेले पाहिजे ही त्याची मनिषा असते. परंतु जेव्हा स्पर्धेचे दिवस सुरू होतात तेव्हा हे पहिलवान महाशय आजारी पडतात. म्हणजे अहोरात्र केलेली मेहनत मातीमोल ठरली की नाही? त्याकरिता वेळेला सदासर्वदा हातावरच्या फोडाप्रमाणे जपणे महत्त्वाचे असते. फक्त एकदाच नव्हे. दैनंदिन आयुष्यात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वेळेचे नियोजन असेल तरच सगळ्या गोष्टी अगदी सुकर होतात नाहीतर वेळेच्या गुंत्यात नको असलेली गोष्ट पदरी पाडून घ्यावी लागते.

      वेळेचे मूल्य सोन्या चांदीहूनही कैकपट अधिक असल्याने अनेक प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार दैनंदिन जीवनात वेळेच्या संदर्भात प्रचलित आहेत. जसे, वेळ गेली निघून आणि हसू आले मागून, वरातीमागून घोडे, तो पहा सूर्य आणि हा जयद्रथ, उशिरा निघाले आणि वेळेला पोहोचले, कल करे सो आज और आज करे सो अभी म्हणजे येन केन प्रकारे वेळेचे महत्त्व या सर्व म्हणी आपल्याला पटवून देतात. काही सेकंदावरून अपघात होण्यापासून बचावलेला एखादा जीव, परीक्षेला जाताना काही मिनिटांवरून सापडलेली गाडी, अंतिम काही तासांच्या घनघोर लढाईत मिळालेला विजय ह्या गोष्टींना वेळेचे महत्व किती? हे तेच लोक चांगल्याप्रकारे सांगू शकतात.

    कधीकधी वेळेच्या बाबतीत एकाकडून झालेली चूक अनेकांना दोष नसताना भोगावी लागते. रेल्वेच्या अमुक-अमुक प्लॅटफॉर्मवर यावेळी दुसरी गाडी उभी असते हे माहित असून देखील वेळ न सांभाळल्याने त्याच प्लॅटफॉर्मवर दुसरी गाडी घेऊन येणाऱ्या चालकाच्या चुकीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अशा बातम्या ऐकून मन सुन्न होते. अर्थात वेळेला सगळ्या गोष्टी सांभाळाव्याच लागतात. अन्यथा मुर्खपणाचा मुकुट चढवून आपली दिंड काढली जाते. सदैव ध्यानीमनी असुद्या जे वेळेला सांभाळतात वेळही त्यांनाच सांभाळून नेते. जवळपास सगळ्यांनासारखे आयुष्य मिळते तरीही काहीच माणसे यशस्वी होतात तर अनेकजण अयशस्वी होतात. याचे कारण वेळेचे नियोजन अस्तव्यस्त होणे हेच आहे. वेळच तारक आहे आणि वेळच मारकही आहे. वेळच घडवते आणि वेळच बिघडवते. वेळेचे गुलाम बनू नका. तर आपले आयुष्य जीवनरुपी भवसागरातून यशस्वीरीत्या पैलतीराला घेऊन जाण्यासाठी स्वतःच्या हातात वल्लव घेऊन नाव योग्य दिशेने आणि योग्य वेळी वल्लवित राहा. 



           लेखक

     अजिनाथ सासवडे

   मु.पो.लोणी(स), आष्टी

   दुरभाष:९४२१३३६०५९




No comments:

Post a Comment

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...