Wednesday, November 19, 2025

मैत्री

 


           "मैत्री"



          दोस्त, सखा, साथी असे नाना पर्यायी शब्द मित्रांसाठी आवर्जून वापरतात. मनुष्य आयुष्यामध्ये अंतर्बाह्यरित्या किती किती बदलत जातो. जुन्या गोष्टींना काळाआड मागे टाकत नवीन गोष्टी आपल्याशा करतो. बालपणीच्या मित्रांची तारुण्यात देखील साथ राहील याची शक्यताही नसते. तथा तारुण्यातील मित्र म्हातारपणापर्यंत टिकून राहतील हे ही ठाम नसते. स्वतःच्या आयुष्यात बदल घडवण्याचा शिरस्ता प्रत्येकजण अंगिकारतो. परंतु निस्वार्थ भावनेतून तयार होते ते म्हणजे मैत्रीचे नाते. जगातल्या कुठल्याही व्यक्तीसमोर आपले दुःख उलघडून मांडताना अल्पसा का होईना मनात संकोच निर्माण होतो, की हा आपली कमजोरी किंवा आपल्या दुःखाचे भांडवल करून आपल्या विरुद्ध दंड थोपटणार तर नाही ना? फक्त एकमेव मैत्रीच्या नात्यात आपण सुख-दुःख सांगताना संकोच, भय बाळगत नाही. अथवा कमीपणाची भावना मनामध्ये निर्माण होत नाही. आपण आपल्या जिवलग मित्राला अगदी निःसंकोचपणे सर्वकाही सांगत असतो. तोही मनात कसलाही किंतु न धरता निःसंकोचपणे ऐकून घेत असतो. 

     मनातील सल ज्याला उघडून दाखवल्यावर हलके हलके वाटू लागते, ते म्हणजे फक्त जिवलग मित्राला. जीवनामध्ये कुणाचे कुणाबरोबर मैत्रीचे धागे जुळतील हे सांगता येत नाही. मैत्रीच्या नात्याला कुठल्याही परिसीमा नाहीत. एकमेकांच्या विचारांची हातमिळवणी झाली म्हणजे मैत्रीचा धागा घट्ट होतो. मैत्री ही धर्म, जात, वर्ण, रंग, रूप, या सर्वांच्या पलीकडे. रक्ताचे नाते हे कुंडीतील झाडाप्रमाणे बंधनात वाढत असते. त्याला खूपदा जातीपातीच्या मर्यादा येतात. परंतु मैत्रीच्या नात्याला कुठलेही बंधन नाही अथवा ते वाढायला कुठलाही अडसर नाही. समाजातील सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरांचे जोखड झुगारून मैत्रीचे नाते फुलत असते. मैत्रीत इतर गोष्टींपेक्षा सुखदुःखाचे आदान-प्रदानचं जास्त होते. दुःखाच्या चटक्याने झालेल्या जखमांवर फुंकर घालत-घालत मैत्रीचे नाते घनिष्ठ होते.

             बहुतांशी लोकांच्या जीवनात प्रगती तथा अधोगती मित्रांवर अबाधित असते. ऐन उमेदीच्या काळात योग्य मित्रांची साथ लाभली तर जीवनातील अडथळे विनासायास पार करून आपला प्रवास सुखकर होतो. अन्यथा कुसंगतीने चांगले जीवनही धुळीस मिळते. "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो" असे म्हटले जाते, कारण सुसंगती अन् सदविचार हे माणसाचा जीवनपट बदलून टाकतात. वाईटाच्या संगतीने वाईटचं घडणार हे निश्चित.

        गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा असा कुठलासा भेदाभेद मैत्रीमध्ये नसतो. मैत्री जन्म घेते ती निस्वार्थ आणि निखळ भावनेतून. जमीन आणि पाण्याच्या मिलनातून बीजाला अंकुर फुटून कोंबाचे रोप तयार होते, तसे माणसा-माणसांत सद्विचाराचे बीजारोपण होऊन मैत्रीचे रोपटे तयार होते. मात्र मैत्रीच्या रोपट्याला आवश्यकता असते ती आधाररूपी संततधारेची. तर ते वटवृक्षसारखे अजन्म टिकून राहते. अन्यथा अल्पकाळातच पाण्याअभावी एखादे रोप कोमेजून जावे त्याप्रमाणे मैत्रीही त्याठिकाणी खंडित होते. मैत्री जुळते ती सहकार्य, प्रेम, आधार नि एकमेकांना कठीण परिस्थितीत दिलेली साथ या भावनेतून. मैत्रीत एकमेकांच्या मनातील भावनांची कदर करणे महत्त्वाचे. पैसा, मानसन्मान, प्रतिष्ठा या गोष्टींच्या पलीकडे असते ती मैत्री. मैत्रीत पैशाची उर्मी तग धरत नाही. मैत्री टिकून राहते ती प्रेमाची संततधार सदैव बरसत राहिल्यानं. सुखदुःखात, पडत्या काळात, अडीअडचणीच्या प्रसंगी खंबीरपणे साथ देतो तोच खरा मित्र. स्वार्थी भावनेतून जन्म घेतलेली मैत्री पत्त्याच्या बंगल्यासारखी क्षणात कोसळून नष्ट होते. मैत्री म्हणजे एकमेकांची साथ, सोबत उठणे-बसणे, एवढेच मैत्रीचे नाते नसून मित्राला मित्रासाठी वेळप्रसंगी भाऊ, आई, वडील, गुरु या सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. आईसारखे कधीतरी मित्राला प्रेमाने समजावून सांगणे. धीर खचलेल्या काळात भावासारखा मदतीचा हात पुढे करणे. चुकीच्या वेळी वडिलांसारखे कठोर शब्दात खडे बोल सुनावणे. कठीण प्रसंगात अथवा दिशाहीन अवस्थेत गुरुसारखे मार्ग दाखवणे, या सर्व भूमिका मित्राने यथासांगपणे चोख पार पाडल्या तर त्याची एका उत्तम मित्रात गणना झाल्याशिवाय राहत नाही.

      कृष्ण-सुदामा, कृष्णार्जुन, कर्ण-दुर्योधन हे घनिष्ठ मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरणं. चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत ज्यांच्या मैत्रीची मशाल तेवत राहील असे महारत्न. श्रीकृष्ण द्वारकेचा राजा असून देखील आपला बालपणीचा मित्र सुदामा आपल्याला भेटायला द्वारकानगरीत आला आहे, हे समजल्यावर सिंहासन सोडून धावतचं आपल्या महालाच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. फाटके कपडे, कृश देहयष्टी, मलीन चेहरा अशी सुदामाची काया असतानासुद्धा त्याला प्रेमाने आलिंगन देऊन श्रीकृष्णाने मिठी मारली. माझा बालपणीचा मित्र आहे, मग तो गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी श्रीकृष्णाने गंगाजळी दिली होती. ज्याच्या उषा-पायथ्याशी दारिद्रय, गरीबी, ठाण मांडून बसलेली आहे, अशा सुदामाला त्याची संपूर्ण सुदामनगरी श्रीकृष्ण सोन्याची करून देतो, ते केवळ मित्राचं नातं नि मैत्रीच्या जपवणूकीसाठी. सुदाम्याचे मलीन कपडे आणि कृश देह पाहून द्वारका नगरीतील सर्वांनी त्याची कुचेष्टा मांडली. दरिद्री, भिकारी अशी नाना प्रकारची विशेषणं लावून सर्वजण त्याची अवहेलना करत होते. परंतु कृष्णाने मात्र सुदाम्याचा आदरातिथ्य करण्यात कसलीही कुचराई केली नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठा म्हणून त्याचे कृष्णाने दर्शन घेतले आणि सुदामाने आणलेले मुठभर पोहे दोघांनी एका ताटात एकमेकांना घास भरवत मिष्टान्न समजून ग्रहण केले. यापेक्षा वेगळी मैत्री काय असावी?

     कृष्णार्जुन यांची मैत्रीही अशीच एकमेकांची सदैव पाठीराखी, सुख-दुःखात एकमेकांना आधार देणारी, पाठीवर प्रेमाची थाप देणारी. मैत्रीसाठी कुरुक्षेत्रातील कौरव-पांडवांच्या युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य श्रीकृष्णाने स्वीकारावे, यापेक्षा घनिष्ठ मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण असू शकेल? जो द्वारकाधीश, संपूर्ण द्वारकानगरीचा राजा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत आहे. हे केवळ मैत्रीसाठीच. मैत्रित राजा असो अथवा रंक तेथे लहान-मोठा या गोष्टींना थारा नसतो.

       कर्ण आणि दुर्योधन यांचीही मैत्री अशाच प्रकारची. दुर्योधनाचा व्यवहार नि वागणूक दोन्हीही धर्माला सोडून होते. दुर्योधन सदैव धर्माला आपल्या पायदळी तुडवत असे. परंतु आपल्याला वाईट काळात दुर्योधनाने साथ दिली, भक्कम आधार दिला, त्याकारणाने दुर्योधन चुकीच्या मार्गाने जात असूनसुद्धा त्याची शेवटपर्यंत कर्णाने साथ सोडली नाही, ही मैत्री. जगासाठी तो लाख वाईट असो, परंतु माझ्यासाठी तो एक देवदूतच आहे. म्हणून त्याची साथ कर्णाने शेवटपर्यंत दिली. दुर्योधनाच्या संगतीत आपला विनाश अटळ आहे, हे कर्णाला माहीत असूनही त्यानं मैत्रीखातर त्याची साथ सोडली नाही. शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक आहे, तोपर्यंत मी दुर्योधनासाठीच लढणार अशी कर्णाने आपल्या मनाशी खूणगाठ बांधलेली.

     अगदी अलीकडच्या काळातील शोले चित्रपटातील जय-वीरूची मैत्री आपणा सर्वांना ज्ञात आहे. मित्राच्या जीवासाठी स्वतःच्या जीवाचीही फिकीर न करणारी खरी मैत्री. आपला या ठिकाणी निश्र्चितच घात होणार आहे, हे माहीत असूनसुद्धा जयने वीरुला मैत्रीची शपथ देऊन पलायन करण्यास सांगितले. मैत्री असावी झाड नि सावलीसारखी. मैत्री असावी फुल नि वासासारखी. मैत्री असावी तर सूर्य न् प्रकाशासारखी सदैव एकमेकांची साथ देणारी. आयुष्यात कितीही बाका प्रसंग उद्धवला तरी, त्यामध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहणे, एकमेकांची साथ देणे, हीच तर खरी मैत्रीची गुणवैशिष्ट्ये. मैत्रीमध्ये तरी असे काय अपेक्षित असते? सुखदुःखात सहभागी होणे, एकमेकांच्या पडत्या काळात आधार देणे, खचलेल्या अवस्थेत प्रेमाची थाप देणे यापलीकडे मैत्रीत काही अपेक्षित आहे? पैसा, संपत्ती ही जीवन मार्गातील साधने, परंतु आपल्या हयातीत अन् आपण नसल्यावरही जीवंत राहते, ती फक्त आपली मैत्री.

       कधीकधी मित्रामित्रांमध्ये काही कारणास्तव खटके उडतात, अनबन होते, तर कधीकधी वैचारिक मतभेदांमुळे मैत्रीत फूट पडली जाते. परंतु या सर्व गोष्टींना वेळप्रसंगी बगल देऊन मित्रांनी मनाचा उदारपणा दाखवून एकमेकांशी प्रेमाचे असलेले ऋणानुबंध दृढ करावे. मैत्रीत फूट पडल्यानं किंवा धाग्यासारखे कधीकधी तुटून नंतर दिलेली गाठ ही काळजामध्ये घर करून बसते. मैत्री ही पत्त्यांच्या बंगल्यागत तकलादूपणे उभी नसावी. मैत्रीत प्रेमाची, आपलेपणाची पाया भरणी अगदी भक्कमपणे करून त्यावर इमारत उभी असावी. तरचं ती अंतिम क्षणापर्यंत तग धरून राहते. खरी मैत्री कधी एकमेकांना एकमेकांचा विसर पडू देत नाही. मैत्री ही अंतरावर नाहीतर अंतर्मनात असणाऱ्या एकमेकांच्या सहृदयतेच्या मजबूत धाग्यांवर टिकून असते.


दैनिक झुंजारनेता ०७ ऑगस्ट, २०२०


      लेखक,

  अजिनाथ सासवडे

  मु.पो.लोणी, आष्टी

दुरभाष:९४२१३३६०५९





No comments:

Post a Comment

कथा - मेटे मामा

    *कथा*                *मेटे मामा* *लेखक- अजिनाथ सासवडे*                      मेटे मामा खरंतर आमच्या वडिलांचा मामा. पण आम्ही लहान-मोठे सगळ...