Wednesday, November 19, 2025

कथा - मेटे मामा

    *कथा*


               *मेटे मामा*


*लेखक- अजिनाथ सासवडे*

          

          मेटे मामा खरंतर आमच्या वडिलांचा मामा. पण आम्ही लहान-मोठे सगळेच त्याला मामा म्हणायचो. त्याच्या नशिबी दोन लग्नाचा योग आला. पण दोन्ही बायका आजारपणामुळे अर्ध्यावर सोडून गेल्यानं त्याचा वेलविस्तार काही वाढला नाही. संसाराच्या गाड्याला अवेळीच खीळ बसल्यानं तो पुढे धकला नाही. तिसऱ्या लग्नाच्या भानगडीत न पडता उरलेलं आयुष्य आर्धीकोर खाऊन शेवटास न्यावे हा विचार त्याच्या मनात ठाण मांडून बसला. आता जीवाभावाचं तर कोणी उरलं नाही. ढळत्या वयात कुण्या नातलगाचा आसरा घ्यावा आणि उरलेलं आयुष्य समाधानानं घालवावं म्हणून लोणी या त्याच्या बहिणीच्या गावी म्हणजे आमच्याकडे येऊन दहा-पाच शेळ्या सांभाळत आपलं पोटापुरतं काम तो करू लागला. 

       आमची परिस्थिती तशी बेताची होती. घर छोटंसं असल्यानं मामानी स्वतःसाठी घरामागं तिन मेढी रोवल्या. मेढीवर आडवे उभे वासे दोरीने करकचून बांधले. दोन्ही बाजूनं, वरून ऊसाचं पाचरट लावून त्यावर बदांट्या बांधल्या. पावसाळ्यात गळू नये म्हणून कोपटी चांगली शेकरली. पाचरटाखाली आतल्या बाजूनं तिला मेनकापड बांधलेलं. बंदाट्यात तुराटीच्या काड्या बांधून कोपीला छातीएवढ्या उंचीचा दरवाजा केलेला. पुरुषभर उंचीपेक्षाही जराशी कमी कोपटी चांगली निटस् वाटत होती. रात्रीच्या अंधारात दिवाबत्तीची सोय म्हणून एक मळक्या काचेचा जुना कंदील(प्रभाकर) एका लाकडी वाशाला कायमचा अडकवून ठेवलेला. 

       "मामा कोपी लई मस्त केली राव." असे शेजारी-पाजारी कोपीचं कोडकौतुक करी. त्यानं मामा हरखून जाई आणि मग त्याला हायसं वाटायचं.   

         मी दहा-बारा न् धाकला भाऊ आठ-दहा वर्षांचा असल जेव्हा मामा साठीच्या घरात होता. आम्हा दोघा भावंडापैकी मामाचा माझ्यावर भारी जीव. एखादी थोरली वस्तू माणसानं आपली म्हणावी, तसा मी थोरला असल्याकारणाने मामानं मला आपलंसं केलं. गोरा वर्ण, धडधाकट बांधा. नाकीडोळी नीटस्. दात अगदी देखणे न् मजबूत. डोळ्याला तेवढा चष्मा लागलेला. चष्म्याच्या दांड्यांना करदोरा बांधून पाठीमागून केसांवर चढवलेला. डोळ्यावरचा चष्मा नाकावर आला तरी तो वर घ्यायचा त्याला भान नसे. डोळ्यावरून चष्मा जसा-जसा खाली येई तशी मान पाठीमागे झुकवून समोर बघत चालायचा. पण चष्मा काही वर घ्यायचा नाही. पांढऱ्या धोतरावरती जराशी मळकट कोपरी. कोपरीच्या एका खिशात सदानकदा तंबाखूची छोटीशी कापडी पिशवी कोंबलेली. त्यामुळे तो खिसा सारखा फुगीर वाटायचा. भास व्हायचा की, काहीतरी खाण्याची वस्तू खिशात दडवून ठेवलीय. आणि मग शाळेतून घरी आल्यावर मी अधून-मधून कोपरीचा खिसा चाचपडत असायचो. पण तंबाखूच्या पिशवी बिगर दुसरं काही हाती यायचं नाही. तंबाखू सांडू नये म्हणून पिशवीच्या तोंडाला एक बारीक दोरी जोडलेली. दोरीनं पिशवीला दोन गाठी मारलेल्या म्हणजे तंबाखू सुरक्षित राहील या हेतूनं. कोपरीच्या दुसऱ्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत दहा-वीस रुपयाच्या चार-दोन नोटा ठेवलेल्या. कधी-कधी बाजारहून शेळी, बोकड विकून आल्यावर शंभाराच्या नोटाही असायच्या. त्या खिशात मामा हात घालू द्यायचा नाही. त्याची नजर चुकवून भसकन् हात घातला न् प्लास्टिकची पिशवी काढली तर मामा माझ्यावर रागवायचा.

         "त्याच्यात पैसे हायेतं, आण् इकडं. हारून जातील." असं तो म्हटला तरी मी पिशवीतले पैसे बाहेर काढून किती आहेत हे तपासून बघितल्याशिवाय परत करायचो नाही. कधी कधी मामाच् म्हणायचा, "अरे मोजून बघ बरं हे सगळे किती भरतेत?" शेळी, करडू विकून आल्यावर पैसे देताना व्यापाऱ्याने आपल्याला फसवलं तर नाही ना? म्हणून तो माझ्याकडून सगळ्या नोटा बरोबर आहेत का? याची खात्री करून घेत असे. मी पैसे मोजून बरोबर आहेत असे सांगितल्यावर मामाचा जीव भांड्यात पडे. मोजून झाल्यावर मी हटकून मोठी नोट माझ्याजवळ ठेवून घेई आणि मला पाहिजेत म्हणायचो.

    "एवढे कशाला पाहिजे तुला, इकडं आन मी देतो तुला सुट्टे पैसे हायेत माझ्याजवळ." आणि मग तो मला खाऊसाठी पाच-दहा रुपयाची एखादी नोट देई. माझ्याजवळची मोठी नोट माघारी देईपर्यंत मामाचा जीव झुरणीला लागलेला असायचा. व्यवस्थित घडी घालून प्लॅस्टिकच्या पिशवीत सगळे पैसे ठेवून कोपरीच्या खिशात घातल्यावर मात्र मामाच्या चेहर्‍यावर हसू उमलायचं.

      पायांतल्या कातडी वहाना उन्हात वाळलेल्या भाकरीगत वाकड्या झालेल्या. मामा बोलून-चालून सरळ माणूस. ठग नाही. वागण्यात अगदी निटस्. कधी कुणाची खोडी नाही की चहाडी नाही. साधेपणाने जगणारा. आपलं काम भलं नि आपण असा त्याचा स्वभाव. बाप्पूनं मामाला आश्रा दिल्यानं तो सुखा समाधानाचे सुस्कारे सोडत होता. 

     मी पाचव्या इयत्तेत गेलेलो. शाळेपेक्षा शेळ्या-करडं, गुरंढोरं यांच्यातच मी जास्त रमायचो. शाळा अशीतशीच चालू होती. मी शाळेतून घरी आलो. दप्तर घराच्या एका कोपऱ्यात भिरकावलं नि मोठ्या नजरेने मी मामाला हुडकू लागलो. तिन्हीसांज होत आलेली, पण कुणीकडूनही शेळ्या घेऊन येताना मामा दिसेना. गायांच्या गोठ्यात मेडीला बांधलेलं कुत्र्याचं पिल्लूही नजरेस पडेना. कुरतडून टाकलेली आर्धी दोरी मात्र खांबाजवळ मेलेल्या सापासारखी वाकडी-तिकडी पडलेली दिसत होती. मोकाट कुत्री पिलाला चावत्याल म्हणून मामा सोबत घेऊन तर गेला नसेल? पण कुरतडलेली आर्धी दोरी खांबाला शिल्लक कशी? मी सैरभैर झालो. इकडं-तिकडं शोधाशोध करू लागलो. रेल्वे जवळून जाताना जसे धडधडते तसे काळीज धडधड करू लागले. त्याचं काही बरं-वाईट तर…? निरभ्र आकाशात एकाएक काळेकुट्ट ढग जमा होऊन वरवर चढावेत तसे विचारचक्र मनात धावू लागले. तितक्यात गोठ्याच्या एका कोपऱ्यात आळं करून पडलेलं पिल्लू दिसलं. माझ्या जीवात जीव आला. पटकन त्याला उचलून घेतले. अलवारपणे कुरवाळले. दुसर्‍या एका दोरीनं पहिल्या जागेवर बांधून वाटीभर दूध ठेवलं आणि पुन्हा मामा आलाय कि नाही ते पाहू लागलो. मनाच्या किनाऱ्याला राहून-राहून शिक्षकांचे दुपारचे बोल लाटांसारखे धडका देत होते, "ज्यांना ज्यांना नवोदयच्या परीक्षेला बसायचे आहे त्यांनी लवकरात लवकर परीक्षा फी जमा करावी. परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे आष्टीला आहे." परीक्षा कशी असेल यापेक्षा आष्टी बघायला मिळणार, एसटीने प्रवास करत बाहेरची झाडं, झुडपं, गावं बघायला मिळतील या विचारानेच मी पार हरखून गेलेलो. परीक्षेला बसायचं म्हणून मनाशी पक्का निर्धार केलेला. काहीही असो परीक्षेच्या निमित्ताने आष्टी बघायला तर मिळेल. गुरुजींनी आष्टीविषयी मनात जागवलेलं कुतूहल विलोभनीय होते. "मोठे शहर आहे. तीन-चार मजली इमारतीमध्ये परीक्षा होते. संपूर्ण तालुक्यातून मुलं येतात, अनुभव येतो." जमीनीवर पाऊस पडला की ती जशी जराशी फुगून वर येते तसे गुरूजींचे बोल आठवल्यावर माझ्या मनाचा गाभारा फुलून वर येई. पैसे तर लागणार होतेच परंतु, एवढ्या मोठ्या गावाची सफर करायला मिळतेय ते का थोडे होते. आष्टीला जाण्याच्या विचारातून मी बाहेर आलो. नजरेने पुन्हा मामाचा शोधाशोध करू लागलो. घराजवळचं असलेल्या लिंबाच्या झाडावर खारूताईसारखं सरसर चढून सगळीकडे न्याहाळून पाहिलं. तेव्हा मामा घरापासून तिन-चार खुटनाच्या अंतरावर पांदीच्या कडेनं शेळ्यामागे झोकांड्या घेत येताना दिसला. 

        मी सरसर लिंबावरून खाली उतरलो. अनवाणी पायाने पाऊल वाट तुडवत निघालो धावतपळत. पाच मिनिटांत मामाला आडवा ठाकलो. धाप लागल्यानं मोठा श्वास सोडला.

  "लई पळत आलास र्ं?" मामानं प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.

   "असंच.." दम टाकतं मी उत्तर दिले.

 मनातली गोष्ट लपवत सुरवातीला मी मुळ विषयाकडे गेलो नाही. 

       "आज शेरडा लई फुगल्यात मामा." मी सहजचं म्हणालो.

एक बारीक करडू चलून-चलून पार थकलेलं. अधूनमधून ते जागीच उभा राहायचं नि अगदी बेंबीच्या देठापासून मॅऽऽऽमॅऽऽऽ असं ओरडायचं. मी पटकन त्याला उचलून पोटाशी धरले. आणि शेळ्यामागे चालू लागलो. मोठी करडं दिवसभर आपल्या आईला पिऊ नये म्हणून शेळ्यांच्या काशेला पिशवी घातलेली. एका शेळीची पिशवी सुटून जमीनीला टेकून लोळत चाललेली. तिन्हीसांज झाल्यानं सूर्य किरणे डोळ्यात तीरासारखी घुसत होती. मामा उभा राहिला. आपला हात वक्राकार करून भुवयांवर धरत मागं राहिलेले करडं आलेत की नाही? हे डोळे बारीक करून बघू लागला. मागं राहिलेल्या करडांच्या ओढीनं शेळ्याही चालता-चालता मध्येच थांबून पाठीमागं बघत अमॅऽऽ अमॅऽऽ असा गलका करायच्या. तान्ही करडं घरीच असलेल्या शेरडा त्यांच्या ओढीनं पुढच्या तोंडाला चाललेल्या.

       टुणटुण उड्या मारत मागं राहिलेल्या करडांनी अर्ध्या मिनिटात आम्हाला गाठलं. शेळ्यांसह मामाचा जीव सुखावला. 

      "मामा आमची नवोदयची परीक्षा हे. मला परीक्षेला बसायचंय." मी हळुवारपणे बोललो.

      "मग बसना, चांगली गोष्ट हे."

    "अरं पण परीक्षा थेट आष्टीला हे." मी म्हणालो.

      "काय? लई लांब हे रं..चुकशील-बिकशील तिकडं." हसत हसत मामा बोलला.

बोलत-चालत आम्ही आमच्या निवडुंगाच्या वावराजवळ आलो. पांदीत असलेल्या निवडुंगाच्या झाडाला जाम चिकटून बसलेली लाली लाल बोंडं मला दुरूनच खुणावू लागली. तोंडाला पाणी सुटले आणि मी मामाला एकाएक म्हणालो,

   "मामा मला लेडुंगाची बोंडं खायची. काढून दे ना."

         "लय काटे हे त्याला, जीभीला टोचत्यान, कशाला उद्योग करून घेतो." मामा कंटाळवाण्या स्वरात बोलला. मी इरीला पेटलेलो बघून मामानं मला शेळ्यांना लक्ष ठेवायला सांगितले. मी पीकाच्या कडेला उभा राहिलो. तोपर्यंत मामानं काठीनं डिवचून-डिवचून तिन-चार बोंडं खाली पाढली. हळुवारपणे दगड-मातीला घासून-पुसून मला दिली. आवडत असूनही मी भीतभीतच खाल्ली. चवदार लागली. बराच वेळ जीभेवर चव रेंगाळत होती. 

    "मामा शेरडा एवढ्या फुगल्यात तरी पुन्हा-पुन्हा जोंधळ्याकडे ओढ का बरं घेत्यात? हे काय कळत नाही." मी सहजचं म्हणालो.

  "शेळ्यांची जातंच लय वढळ, पोटफुगुस्तोर खाल्लं तरी त्यांचं समाधान नाही आणि घराच्या वाटंला लागल्यावं तर हमखास मालात तोंड घालणार म्हणजे घालणार." मामा बोलत होता. जस जसं घर नजरेच्या टप्प्यात आले तस-तशी शेळ्यांची धावपळ पाहण्याजोगी होती. ही तिच्यापुढे की ती तिच्यापुढे. मागेपुढे होत शेळ्या घराजवळ येऊन थबकल्या. तान्ही करडं दिवसभर कुत्र्यांच्या भीतीपोटी झापाखाली डालून ठेवलेली. ज्या शेळीचं करडू झापाखाली डालून ठेवलेलं ती त्याच्याभोवती गोल गोल यरझऱ्या घालू लागली. मी शेळ्यांच्या पावलावर पाऊल देत धावत-पळत आलेलो. मामा लंगडत लंगडत पाठीमागून येत होता. तो घराजवळ आला. शेळ्या आपापल्या मेखीला बांधल्या. तोपर्यंत तान्ह्या करडांनी मॅऽऽमॅऽऽमॅऽऽ असा एकच गलका केला. मामाने पटकन झाप वर केला. करडं आपापल्या आईकडे सुसाट निघाली. थानाला तोंड लावून चराचरा दूध गोठू लागली. शेळ्याही आपापल्या करडांना चटाचटा चाटू लागल्या. बोकड तर त्याच्या बाजूचे दूध पिऊन पुन्हा दुसऱ्या बाजूचे पिण्यासाठी धडपड करी. दूध पिल्यानंतर मामानं बोकडांना पायांमध्ये गच्च पकडून ठेवलं. एक-दोन मिनिटांत करडं पोटभर दूध पिऊन अंगणात आनंदाने टुणटुण उड्या मारू लागली.

       थोडा वेळ त्यांचाबी पाय मोकळा होईल म्हणून मामान् त्यांना हिंडू दिलं. दिवस मावळला. हळूहळू कडूसं पडायला लागलं. मामान् कोपीचं दार केव्हाच उघडले होते. गार वारा सुटला होता. कोपीवरची पाचरटाची मोकळी पानं वारा आल्यावर नागिनीगत डुलत होती. शेळ्या डोळे मिटून रवंथ करत बसल्या. रानात गेलेली घरातील सगळी माणसं एकेक करून घरी येऊ लागली. झाडून-लोटून झाल्यावर दिवाबत्ती लागली. चूल पेटली. दिवसभर मुकं मुकं असणारं घर सायंकाळी बोलायला लागलं. चहा उकळला. चहाचा सुगंध घराच्या अवतीभवती दरवळू लागला. इतक्यात आईने "चहा घेऊन जारे तिकडे." म्हणून जोरात आवाज दिला. चहा म्हटल्यावर मी पळतच गेलो. कपबशी भरून चहा हातात घेऊन आलो. मामान् सुर्ऽऽ सुर्ऽऽ करत चहा ओढला. मीही प्यालो. कोपीच्या समोरच शेळ्यांना निवाऱ्यासाठी छोटंसं छप्पर बनवलेलं. छपरात नेहमीप्रमाणे भगवान चिलीम ओढत होता. त्याच्या वासानं सगळं वातावरण दूषित झालेलं. मी म्हटलं "बॉयलर पेटलाय वाटतं." तो खीऽऽ खीऽऽ करत हसू लागला. बऱ्याच वेळेपासून गाया हंबरू लागलेल्या. बाप्पूनी मला जोरात आवाज दिला.

        "ऐ पोरा चल लवकर, खुराक ठू गायांनला."

   मामानी हलकेच मला दटावलं, "पळपळ तोवा बाप हाका मारतोय."

मी उठलो, पळतचं खुराकाची घमेली उचलली, गायांना खुराक मांडला. खुराक खाऊन रिकामी झाल्यावर मी घमेली लगेचच एका जागेवर ठेवली. पुन्हा घरामागं मामाजवळ येऊन बसलो. मनात विचारचक्र फिरू लागले, सांगितलेली परीक्षा फी उद्या द्यावी लागेल. बराच वेळ वाफ कोंढल्यावर कुकरची शिट्टी वाजावी तसा उमाळा आला नि मी म्हटलं, 

     "मामा मला पैसे देना..उद्या परीक्षा फी द्यायची सरला."

"बाप्पूला माग ना.." मामा म्हणाला.

    "ते नाय द्यायचे…तू दी." मी लडीवाळपणे बोललो.

"माझ्याजवळ नाहीत.. जमलं तर उद्या कुणाकडून बघून देईन. एक काम कर बरं, ह्या डायरीवर लिहून ठूलेले पैसे वाच बरं कोणा-कोणाला किती तारखेला दिलेत."

    मी बरीच नावं, तारखा आणि दिलेले पैसे वाचले. मामा आठवू लागला. बराच वेळ आम्ही इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत बसलो. एकमेकांचे चेहरे काही दिसत नव्हते. अंधाराने आपले हात-पाय पसरवलेले होते. रात्रीचे जेवण उरकले. फक्त जेवणापुरताच कंदील मामानं पेटवला. जेवण झाल्यावर कंदीलाचा खटका दाबून वातीवर जोराची फुंकर मारत मामाने कंदील विझवला. अंथरूणावर अंग टाकून हळू आवाजात आम्ही बोलत होतो. बोलता-बोलता कधी झोप लागली कळले सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मामानं पैसे दिलेल्या लोकांचे घर गाठले. मात्र पदरी पैशाऐवजी निराशाच पडली. शाळेत दिवसभर डोक्यात विचार घोळत होते, मामाला पैसे मिळाले असतील? आता उद्या नवोदय परीक्षेची फी देऊन टाकू सरला म्हणजे आपला परीक्षेला जाण्याचा मार्ग मोकळा होईल. तिसऱ्या प्रहरी शाळेतून घरी आलो. कालच्यासारखेच पुन्हा मामाकडे धावत पळत गेलो, परंतु दुरूनच मामाच्या चेहऱ्यावर सुतकी कळा अवतरलेली दिसत होती. 

     "कुणी एक रुपयाही दिला नाही." असे मामा मला काकुळतीला येऊन सांगू लागला. परंतु आज मात्र मी मामाला सळो कि पळो करून सोडले.

   "काहीही असो आज मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजेच." असा मी रागाच्या भरात हेकाच धरला.

   "दोन दिवस थोडं थांब. सोमवारी वाळकीच्या बाजाराला जाऊन एक बोकड विकून टाकतो आणि तुला पैसे देतो." असे मामा मला विश्वास देत बोलू लागला.

    त्यादिवशी सायंकाळी घरी आल्यावर आम्ही कोपी म्होरं बैठक टाकलेली. आम्ही दोघा भावांनी गावातून आणलेल्या कुत्र्याच्या पिलाला मी गोंजारत होतो. हिंदी भाषेविषयी मनात फारच कुतुहल होते. हिंदी चित्रपटांचा मनावर भारी पगडा. कुत्र्याला हिंदीत काय म्हणत असावेत हा विचार मला अनेक दिवसांपासून स्वस्थ बसू देईना म्हणून मी मामाला सहज विचारू लागलो.

    "मामा, ऐ मामा.. कुत्र्याला हिंदीत काय म्हणतेत ते सांगा ना?" 

  "अरे मला नाही सांगता येत."

"नाही म्हंजे.. काहीही असलं तरी तुला सांगावंच लागल."

 दिवस मावळतीला भगवानचा चिलीम ओढण्याचा कार्यक्रम काही केल्या चुकत नव्हता. तो आपल्या नादात झुरक्या मागून झुरके ओढत होता. मी मामाला सारखं विचारून-विचारून जेरीस आणलं. मला वाटायचं मामाला माहीत असूनही तो मला मुद्दामहून सांगत नाही. माझ्या डोक्यात कुत्र्याला हिंदीत काय म्हणतात याचं खूळ बसलेलं. सारखं सारखं विचारून मी त्रास देतोय म्हणून माझा नाद मोडण्यासाठी मामा सहजपणे म्हणाला,"कुत्र्याला हिंदीत 'कुत्ता बोले उसका' असं म्हणत्यात." ते ऐकल्यावर मात्र भगवान चिलीम ओढता-ओढता खदखदून हसू लागला. त्याचं तोंड चिलमीला बिलगलेलं असलं तरी कान सदैव आमच्या बोलण्याकडे असायचे. भगवानच्या हसण्यावरून मला जाणवले, की मामा मला गंडवतोय.

   "उगा काहीतरी सांगू नको, खरं सांग ना..?" मी म्हटलं. 

    "अरे खरंच सांगतोय मी." मामा पोटतिडकीने बोलत होता. तेव्हापासून भगवानचीन् माझी गाठभेट झाली की तो मला हटकून म्हणायचा, "कुत्ता बोले उसका कुडंहे." मी चपापल्यासारखा व्हायचो.

     सोमवारी झुंजुमुंजू पहाटेच मामानं चांगलं शेलकं बोकड(बंड्याला) बाजाराला विकायला नेलं. मी उठल्यावर बघतोय तर बाकीच्या शेळ्या जीथल्या तिथं होत्या पण बंड्यान् मामा काही दिसत नव्हते. मी समजून चुकलो मामा बाजारला गेलाय वाटतं. दिवसभर माझं मन फुलपाखरासारखं इकडून-तिकडं, तिकडून-इकडं धाव घेई. शिक्षकांच्या शिकवण्याकडे माझे जरासेही लक्ष लागत नव्हते. आता मामाचे बोकड विकून झाले असेल? पैसे मिळाले असतील? अशा नाना विचारात माझे मन राहून-राहून गढून जायचे. कधी एकदाची शाळा सुटतेय आणि घरी जाऊन मामाला भेटतोय असे जीवाला झालेलं. दिवस सरता सरेना. मुंगीच्या चालीने सूर्य हळूहळू चाललेला. एकदाची शाळा सुटली आणि मी शाळेतून घरी परतलो. मामा बाजाराहून येऊन शेळ्या चारायला गेलेला. मी थेट रानातच मामाला गाठलं. मामा दिसल्यावर माझ्या चेहऱ्यावर हसू फुटले. आता आपल्याला परीक्षेला जायचे पक्के झालेच म्हणून समजा. पाटातील पाण्यासारखा माझा चेहरा खुलला. मी मामाच्या पाठीमागून जाऊन अचानक भाॅ‌ऽऽ केले. मामानं चमकून मागं पाहिलं. पण जरासाही दचकला नाही, त्याला माझी सवय माहीत होती.

        "आला का?" 

       "हा, पळतच आलो आज शाळेतून. बोकड ईकलं?"

      "हा, तुझ्या नवंदय का फवंदय परीक्षेसाठी चांगलं बोकड विकावं लागलं ना. लय चांगला होता बंड्या, पण दिला सस्ता-महाग करून."

     "पैसे आणले?" जराशीही उसंत न घेता मी बोलत होतो.

   "हा आणले बाबा."

       "बघुदे"

"आता मी काय पळून चाललोय? घरी गेल्यावर संध्याकाळी देतो."

      "नाय नाय आत्ता दाखवं, आपण मोजून बघू." 

      "लई हाट्टी पोरगं, त्याचीच टर पुरी करणार.."

मामानं प्लॅस्टिकच्या पिशवीत निटनेटके घडी घालून ठेवलेले पैसे अलगद बाहेर काढले आणि माझ्या हातात दिले. मी तर आनंदाच्या लाटांवर तरंगायलाच लागलो. सगळे पैसे मोजले.

        "शाळेत जाताना उद्या सकाळी पैसे घेऊन जा, आता माझ्याजवळ ठेवतो." मामा म्हणाला.

    दिवस मावळायला गेलेला. झाडाझुडपांवर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे ते पिवळसर लाल रंगाचा गिलावा दिल्यासारखे वाटत होते. सायंकाळ झाली. रात्र झाली. गार वारा अंगाला झोंबत होता. तरीही मी मामाच्या सोबतच नेहमीसारखा. मामाच्या लळ्यानं मला कायमचं जखडून ठेवलेलं. त्याचाही माझ्यात जीवा अडकलेला. सकाळी मामाने मला फी पुरते पैसे दिले. मी शाळेत फी जमा केली. महिन्या दोन महिन्यात परीक्षा होती. परीक्षेला जाताना मला मामाने बोकडाचे आलेले तीनशे रुपये दिले. परीक्षा अगदी चांगली गेली. दिवसामागून दिवस लोटले. सुट्टीच्या दिवशी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी मामाला शेपटासारखा चिकटलेलो असायचो. शेजारी-पाजारी नेहमी म्हणायचे, "मामा ही पोरगं भाकरीच्या उरावर कांदा कशाला घेऊन फिरतो." मी कधीकधी एखाद्या जागेवर खूतून बसलो, की मामाला कष्टी मनाने खांद्यावर उचलून घ्यायला लागायचं. काट्या-कुपाट्या, नांगरलेल्या रानातून मोठ मोठे पाऊल टाकत मामा शेळ्या जवळ करत असे. मी खांद्यावर बसून असल्याने त्याचा जीव पार जेरीस यायचा आणि मग कधी कधी म्हणायचा, "च्यायला ह्या पोराचे, नको नको केलंय यानी." ओरडायचा, रागवायचा. पण मला खांद्यावरून खाली मात्र उतरवत नसे. मीही फार जिद्दी. जिथं मामा मला उतरवायचा तिथून चार पाऊल पुढे टाकल तर जणू मला शपथ. त्याच जागेवर घट्ट पाय रोवून उभा राहायचो. दोन पावले मागे फिरून मामा मला उचलून घ्यायचा. भरपूर लाड पुरवायचा. मागल ती गोष्ट हजर करायचा‌. अधूनमधून दळण आणायला साकतला गेला की खाऊ घेऊन यायचा. कुठंही गेला तरी रिकाम्या हाताने कधी माघारी यायचा नाही. त्याला कुणी काही खायला दिलं तर ते माझ्यासाठी लावून ठेवायचा. जीवापाड प्रेम करायचा माझ्यावर. बहुदा अनेकजण म्हणायचे, "मामा तू याचे एवढे लाड करतो, म्हातारपणी ही पोरगं सांभाळीन का तुला?" 

     हसत हसत मामा बोलायचा, "त्याची बायको सांभाळीन ना, भाकर तुकडा दिला बसं झालं. मला तरी काय लागतंय बापड्याला?" 

     वर्षामागून वर्ष सरत होते. मामा आता थकत चाललेला. मी सातव्या वर्गात पोहोचलो होतो. एके रात्री मामाचे अन् माझे भांडण झाले. मी सकाळी उठून पाहतो तर मामा गायब झालेला. भांडण झाल्यानं अथवा काहीतरी कारणानं मामा भल्या पहाटेच कुठेतरी निघून गेला. दोन-तीन दिवसानंतर समजले की मामा अंभोरा या त्याच्या गावी गवळ्यांच्या गोठ्यावर राहतो आहे. मी उदास उदास राहू लागलो. कशातही मन लागत नव्हते. माझे अन् मामाचे भांडण झालेला प्रसंग काळजावर ओरखडे ओडत होता. मी लहान होतो तरीही आपल्याकडून घोडचूक झाल्याची जाणीव मला होत होती. महिन्याभरात निरोप आला की मामा आजारी पडलाय. मला राहवेना. मी आज्जीला म्हणालो, "आपण मामाला भेटायला जाऊ. आणि त्याला इकडं घेऊन येऊ." 

       आज्जीन् मी अंभोऱ्याला पाई चालत गेलो. मामाजवळ पोहोचलो. कृश देहयष्टी, खोलवर गेलेले डोळे, खोकून खोकून छातीचा पिंजरा उघडा पडलेला. मामाच्या शरीरात एवढा मोठा झालेला बदल मला पाहवेना. लाजेनं मी पाणी पाणी झालो. माझ्यामुळे मामा आज खितपत पडलाय ही बोचनी काळजाला लागत होती. काय बोलावे म्हणून मला शब्दच सूचेना. आज्जी बोलू लागली, "उठं, अजिनाथ तुला न्यायला आलाय." तितक्यात मामाला खोकल्याची जोरात उबळ आली. खोकून शांत झाल्यावर जोराचा श्वास भरत मामा मला बोलला, "काय काळजी करू नको. जरा बरं वाटलं की येतो मी चार-आठ दिवसांत. अभ्यास करतो का? अभ्यास करून मोठा माणूस व्हायचं. शेरडा, करडात काय नाय बघ.." मला भडभडून आले. घसा कोरडा पडला. मनानं दटावूनही जीभ काही बोलण्यास धजावत नव्हती. श्वास कोंडून जीभ दगडागत झालेली. मी नुसतीच मान डोलावली.

           दुसऱ्या दिवशी आम्ही रिकाम्या हाताने माघारी आलो. मामाची काळजी लागलेली होतीच. शाळेत, घरी कुठेच मन लागत नव्हते. एके दिवशी आम्ही पोरं पोरं लघवीच्या सुट्टीत शाळेतून गावातल्या घरी आलेलो. ओसरीवर थंडगार पाण्याचा माठ ठेवलेला असायचा कायम. घटाघटा पाणी पिलो. मला पाहिल्याबरोबर सुनंदा काकी म्हणू लागली, "अजिनाथ तू नाही गेला काय अंबोऱ्याला? मामा वारला ना.." बसं हे शब्द कानावर पडले आणि आपलं काळीज कुणीतरी दगडानं ठेचतंय असं वाटू लागलं. कंठ दाटून आला. श्वास गुदमरला. आवाज फुटेना. जीभेला जखडून ठेवल्यागत झालेलं. अवतीभवती पोरं असूनही हुंदका फुटून मी फुंदुफुंदु रडू लागलो. धावत शाळेत गेलो‌. डोळे पुसत दप्तर घेऊन रानच्या वाटेला लागलो. छोटा भाऊ सोबत होता. गावकुसाबाहेर बाप्पू भेटले. "पोरांनो, मी अंभोऱ्याला चाललोय, यायला उशीर होईन गायांना चारापाणी करा. इकडं तिकडं फिरू नका." असे सांगून सायकलवर टांग टाकून ते निघून गेले.

      आम्ही चपळाईने घरी आलो. मी भीतभीत शेजारच्या अप्पाला सायकल मागितली. त्यांनीही दिली. सायकलवर टांग टाकून कुठेही न थांबता मी नेटानं अंभोरा जवळ करू लागलो. अंभोरा जसजसे जवळ येऊ लागले तसतशी माझ्या सायकलची गती दुप्पट वाढली. ओढीनं. मी तेथे पोहोचलो. मला पाहून सर्वांनाच रडू कोसळले. अनेकांनी मला जवळ ओढून घेतले. तोंडावरून, पाठीवरून हात फिरवला. पाणावलेले डोळे पुसले. "मामासाठी एवढ्या लांबून लेकरू एकटं सायकलवर आलंय" म्हणून अनेकांनी नवल केले. मयत झाली होती. मामाचा चेहरा तरी बघायला मिळेल म्हणून मी अग्निडाग दिलेल्या जागेकडे धाव घेतली. पण सर्व संपले होते. सरण जळून राख झाली होती. राखेखालचा लालबुंद विस्तव वाऱ्याच्या झुळकीसरशी बाहेर डोकावत होता. त्यानं बजावलेल्या चोख कार्याची पावती तो मला मोठ्या दिमतीनं देत होता. निखाऱ्यानं राखराख केलेल्या मामाच्या स्थूल देहाच्या आठवणीत रमून मी तसाच एकटक राखेकडे पाहत राहिलो..


      

   लेखक 

  अजिनाथ सासवडे

     आष्टी, बीड

   मो.९४२१३३६०५९

  

      


  

      


मैत्री

 


           "मैत्री"



          दोस्त, सखा, साथी असे नाना पर्यायी शब्द मित्रांसाठी आवर्जून वापरतात. मनुष्य आयुष्यामध्ये अंतर्बाह्यरित्या किती किती बदलत जातो. जुन्या गोष्टींना काळाआड मागे टाकत नवीन गोष्टी आपल्याशा करतो. बालपणीच्या मित्रांची तारुण्यात देखील साथ राहील याची शक्यताही नसते. तथा तारुण्यातील मित्र म्हातारपणापर्यंत टिकून राहतील हे ही ठाम नसते. स्वतःच्या आयुष्यात बदल घडवण्याचा शिरस्ता प्रत्येकजण अंगिकारतो. परंतु निस्वार्थ भावनेतून तयार होते ते म्हणजे मैत्रीचे नाते. जगातल्या कुठल्याही व्यक्तीसमोर आपले दुःख उलघडून मांडताना अल्पसा का होईना मनात संकोच निर्माण होतो, की हा आपली कमजोरी किंवा आपल्या दुःखाचे भांडवल करून आपल्या विरुद्ध दंड थोपटणार तर नाही ना? फक्त एकमेव मैत्रीच्या नात्यात आपण सुख-दुःख सांगताना संकोच, भय बाळगत नाही. अथवा कमीपणाची भावना मनामध्ये निर्माण होत नाही. आपण आपल्या जिवलग मित्राला अगदी निःसंकोचपणे सर्वकाही सांगत असतो. तोही मनात कसलाही किंतु न धरता निःसंकोचपणे ऐकून घेत असतो. 

     मनातील सल ज्याला उघडून दाखवल्यावर हलके हलके वाटू लागते, ते म्हणजे फक्त जिवलग मित्राला. जीवनामध्ये कुणाचे कुणाबरोबर मैत्रीचे धागे जुळतील हे सांगता येत नाही. मैत्रीच्या नात्याला कुठल्याही परिसीमा नाहीत. एकमेकांच्या विचारांची हातमिळवणी झाली म्हणजे मैत्रीचा धागा घट्ट होतो. मैत्री ही धर्म, जात, वर्ण, रंग, रूप, या सर्वांच्या पलीकडे. रक्ताचे नाते हे कुंडीतील झाडाप्रमाणे बंधनात वाढत असते. त्याला खूपदा जातीपातीच्या मर्यादा येतात. परंतु मैत्रीच्या नात्याला कुठलेही बंधन नाही अथवा ते वाढायला कुठलाही अडसर नाही. समाजातील सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरांचे जोखड झुगारून मैत्रीचे नाते फुलत असते. मैत्रीत इतर गोष्टींपेक्षा सुखदुःखाचे आदान-प्रदानचं जास्त होते. दुःखाच्या चटक्याने झालेल्या जखमांवर फुंकर घालत-घालत मैत्रीचे नाते घनिष्ठ होते.

             बहुतांशी लोकांच्या जीवनात प्रगती तथा अधोगती मित्रांवर अबाधित असते. ऐन उमेदीच्या काळात योग्य मित्रांची साथ लाभली तर जीवनातील अडथळे विनासायास पार करून आपला प्रवास सुखकर होतो. अन्यथा कुसंगतीने चांगले जीवनही धुळीस मिळते. "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो" असे म्हटले जाते, कारण सुसंगती अन् सदविचार हे माणसाचा जीवनपट बदलून टाकतात. वाईटाच्या संगतीने वाईटचं घडणार हे निश्चित.

        गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा असा कुठलासा भेदाभेद मैत्रीमध्ये नसतो. मैत्री जन्म घेते ती निस्वार्थ आणि निखळ भावनेतून. जमीन आणि पाण्याच्या मिलनातून बीजाला अंकुर फुटून कोंबाचे रोप तयार होते, तसे माणसा-माणसांत सद्विचाराचे बीजारोपण होऊन मैत्रीचे रोपटे तयार होते. मात्र मैत्रीच्या रोपट्याला आवश्यकता असते ती आधाररूपी संततधारेची. तर ते वटवृक्षसारखे अजन्म टिकून राहते. अन्यथा अल्पकाळातच पाण्याअभावी एखादे रोप कोमेजून जावे त्याप्रमाणे मैत्रीही त्याठिकाणी खंडित होते. मैत्री जुळते ती सहकार्य, प्रेम, आधार नि एकमेकांना कठीण परिस्थितीत दिलेली साथ या भावनेतून. मैत्रीत एकमेकांच्या मनातील भावनांची कदर करणे महत्त्वाचे. पैसा, मानसन्मान, प्रतिष्ठा या गोष्टींच्या पलीकडे असते ती मैत्री. मैत्रीत पैशाची उर्मी तग धरत नाही. मैत्री टिकून राहते ती प्रेमाची संततधार सदैव बरसत राहिल्यानं. सुखदुःखात, पडत्या काळात, अडीअडचणीच्या प्रसंगी खंबीरपणे साथ देतो तोच खरा मित्र. स्वार्थी भावनेतून जन्म घेतलेली मैत्री पत्त्याच्या बंगल्यासारखी क्षणात कोसळून नष्ट होते. मैत्री म्हणजे एकमेकांची साथ, सोबत उठणे-बसणे, एवढेच मैत्रीचे नाते नसून मित्राला मित्रासाठी वेळप्रसंगी भाऊ, आई, वडील, गुरु या सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. आईसारखे कधीतरी मित्राला प्रेमाने समजावून सांगणे. धीर खचलेल्या काळात भावासारखा मदतीचा हात पुढे करणे. चुकीच्या वेळी वडिलांसारखे कठोर शब्दात खडे बोल सुनावणे. कठीण प्रसंगात अथवा दिशाहीन अवस्थेत गुरुसारखे मार्ग दाखवणे, या सर्व भूमिका मित्राने यथासांगपणे चोख पार पाडल्या तर त्याची एका उत्तम मित्रात गणना झाल्याशिवाय राहत नाही.

      कृष्ण-सुदामा, कृष्णार्जुन, कर्ण-दुर्योधन हे घनिष्ठ मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरणं. चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत ज्यांच्या मैत्रीची मशाल तेवत राहील असे महारत्न. श्रीकृष्ण द्वारकेचा राजा असून देखील आपला बालपणीचा मित्र सुदामा आपल्याला भेटायला द्वारकानगरीत आला आहे, हे समजल्यावर सिंहासन सोडून धावतचं आपल्या महालाच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. फाटके कपडे, कृश देहयष्टी, मलीन चेहरा अशी सुदामाची काया असतानासुद्धा त्याला प्रेमाने आलिंगन देऊन श्रीकृष्णाने मिठी मारली. माझा बालपणीचा मित्र आहे, मग तो गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी श्रीकृष्णाने गंगाजळी दिली होती. ज्याच्या उषा-पायथ्याशी दारिद्रय, गरीबी, ठाण मांडून बसलेली आहे, अशा सुदामाला त्याची संपूर्ण सुदामनगरी श्रीकृष्ण सोन्याची करून देतो, ते केवळ मित्राचं नातं नि मैत्रीच्या जपवणूकीसाठी. सुदाम्याचे मलीन कपडे आणि कृश देह पाहून द्वारका नगरीतील सर्वांनी त्याची कुचेष्टा मांडली. दरिद्री, भिकारी अशी नाना प्रकारची विशेषणं लावून सर्वजण त्याची अवहेलना करत होते. परंतु कृष्णाने मात्र सुदाम्याचा आदरातिथ्य करण्यात कसलीही कुचराई केली नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठा म्हणून त्याचे कृष्णाने दर्शन घेतले आणि सुदामाने आणलेले मुठभर पोहे दोघांनी एका ताटात एकमेकांना घास भरवत मिष्टान्न समजून ग्रहण केले. यापेक्षा वेगळी मैत्री काय असावी?

     कृष्णार्जुन यांची मैत्रीही अशीच एकमेकांची सदैव पाठीराखी, सुख-दुःखात एकमेकांना आधार देणारी, पाठीवर प्रेमाची थाप देणारी. मैत्रीसाठी कुरुक्षेत्रातील कौरव-पांडवांच्या युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य श्रीकृष्णाने स्वीकारावे, यापेक्षा घनिष्ठ मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण असू शकेल? जो द्वारकाधीश, संपूर्ण द्वारकानगरीचा राजा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत आहे. हे केवळ मैत्रीसाठीच. मैत्रित राजा असो अथवा रंक तेथे लहान-मोठा या गोष्टींना थारा नसतो.

       कर्ण आणि दुर्योधन यांचीही मैत्री अशाच प्रकारची. दुर्योधनाचा व्यवहार नि वागणूक दोन्हीही धर्माला सोडून होते. दुर्योधन सदैव धर्माला आपल्या पायदळी तुडवत असे. परंतु आपल्याला वाईट काळात दुर्योधनाने साथ दिली, भक्कम आधार दिला, त्याकारणाने दुर्योधन चुकीच्या मार्गाने जात असूनसुद्धा त्याची शेवटपर्यंत कर्णाने साथ सोडली नाही, ही मैत्री. जगासाठी तो लाख वाईट असो, परंतु माझ्यासाठी तो एक देवदूतच आहे. म्हणून त्याची साथ कर्णाने शेवटपर्यंत दिली. दुर्योधनाच्या संगतीत आपला विनाश अटळ आहे, हे कर्णाला माहीत असूनही त्यानं मैत्रीखातर त्याची साथ सोडली नाही. शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक आहे, तोपर्यंत मी दुर्योधनासाठीच लढणार अशी कर्णाने आपल्या मनाशी खूणगाठ बांधलेली.

     अगदी अलीकडच्या काळातील शोले चित्रपटातील जय-वीरूची मैत्री आपणा सर्वांना ज्ञात आहे. मित्राच्या जीवासाठी स्वतःच्या जीवाचीही फिकीर न करणारी खरी मैत्री. आपला या ठिकाणी निश्र्चितच घात होणार आहे, हे माहीत असूनसुद्धा जयने वीरुला मैत्रीची शपथ देऊन पलायन करण्यास सांगितले. मैत्री असावी झाड नि सावलीसारखी. मैत्री असावी फुल नि वासासारखी. मैत्री असावी तर सूर्य न् प्रकाशासारखी सदैव एकमेकांची साथ देणारी. आयुष्यात कितीही बाका प्रसंग उद्धवला तरी, त्यामध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहणे, एकमेकांची साथ देणे, हीच तर खरी मैत्रीची गुणवैशिष्ट्ये. मैत्रीमध्ये तरी असे काय अपेक्षित असते? सुखदुःखात सहभागी होणे, एकमेकांच्या पडत्या काळात आधार देणे, खचलेल्या अवस्थेत प्रेमाची थाप देणे यापलीकडे मैत्रीत काही अपेक्षित आहे? पैसा, संपत्ती ही जीवन मार्गातील साधने, परंतु आपल्या हयातीत अन् आपण नसल्यावरही जीवंत राहते, ती फक्त आपली मैत्री.

       कधीकधी मित्रामित्रांमध्ये काही कारणास्तव खटके उडतात, अनबन होते, तर कधीकधी वैचारिक मतभेदांमुळे मैत्रीत फूट पडली जाते. परंतु या सर्व गोष्टींना वेळप्रसंगी बगल देऊन मित्रांनी मनाचा उदारपणा दाखवून एकमेकांशी प्रेमाचे असलेले ऋणानुबंध दृढ करावे. मैत्रीत फूट पडल्यानं किंवा धाग्यासारखे कधीकधी तुटून नंतर दिलेली गाठ ही काळजामध्ये घर करून बसते. मैत्री ही पत्त्यांच्या बंगल्यागत तकलादूपणे उभी नसावी. मैत्रीत प्रेमाची, आपलेपणाची पाया भरणी अगदी भक्कमपणे करून त्यावर इमारत उभी असावी. तरचं ती अंतिम क्षणापर्यंत तग धरून राहते. खरी मैत्री कधी एकमेकांना एकमेकांचा विसर पडू देत नाही. मैत्री ही अंतरावर नाहीतर अंतर्मनात असणाऱ्या एकमेकांच्या सहृदयतेच्या मजबूत धाग्यांवर टिकून असते.


दैनिक झुंजारनेता ०७ ऑगस्ट, २०२०


      लेखक,

  अजिनाथ सासवडे

  मु.पो.लोणी, आष्टी

दुरभाष:९४२१३३६०५९





कथा - मेटे मामा

    *कथा*                *मेटे मामा* *लेखक- अजिनाथ सासवडे*                      मेटे मामा खरंतर आमच्या वडिलांचा मामा. पण आम्ही लहान-मोठे सगळ...