Tuesday, February 11, 2020

फारकत

         "फारकत"

(🖕 येथे टच करुन,वाचनाचा छंद जोपासा.)

           संसार म्हटलं की,त्यात सर्वकाही.सुख दुःखाच्या लाटा संसार रुपी समुद्रात नित्याने येत असतात आणि त्यांना पती-पत्नीने धैर्याने सामोरे जायचं असतं,ज्यांना हे जमलं त्यांचे संसार पैलतीरास गेले,ज्यांना नाही जमलं,त्यांनी फारकतीसारखा मार्ग पत्करून आपला संसार धुळीस मिळवला.अशाच एका जोडप्याची ही करून कहाणी"फारकत"या नाटीकामय लेखात उतरवली आहे.ती मांडताना सुखापेक्षा दुःखच जास्त होत आहे,कारण आधुनिक समाजात फारकत घेणे म्हणजे अगदी पोरखेळ झाला आहे.अगदी शुल्लक कारणावरूनही नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन फारकती सारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत.परंतु त्याचा परिणाम दोन व्यक्तीवर किंवा दोन कुटुंबावरच नव्हे,तर सर्व समाजावर होत आहे.याचा आधुनिक पिढीने अनेकदा विचार करून पुढचे पाऊल उचलावे.पती-पत्नी दोघांच्या ताटातुटीने मुलाबाळांची होत असलेली हेळसांड नक्कीच हृदयाला पीळ पाडणारी आहे.

              जोशी गुरुजी व जोशी बाई यांची लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी वनिता हीचा विवाह एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कंपनी कामगार मोहन या युवकाशी होतो.सासरी गेल्यावर लाडाने वाढलेल्या वनिताच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट होईलच,ही माहेरच्यांची अपेक्षा फोल ठरताना दिसत होती.त्याचवेळी जवळ असलेली पैशाची ऊब,जोशी सर व बाई यांना शांत बसू देत नव्हती.

(मोहन-वनिताचा संसार अगदी सुरळीत चाललेला.सुखदुःखाच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी संसार रुपी चादर चांगलीच विणली जात होती.मोहन नियमित कंपनीत जात असे आणि कंपनीतून थकून आल्यानंतर वनिताही आस्थेने चौकशी करत.असा त्यांचा संसार गोडीगुलाबीने चालू होता.परंतु जोशी बाईच्या नाक खुपसण्याने मोहन व वनिताच्या संसारात मिठाचा खडा पडला.)

मोहन: वनिता...अग माझे बूट कुठे ठेवलेत कंपनीत जायला उशीर होतोय,आन पटकन,तुला कितीवेळा सांगितलं,की सकाळी सकाळी घाई असते,बूट,कपडे जिथल्या तिथे ठेवत जा,पण तुझ्यात मात्र काही बदल नाही.

वनिता: हे घ्या...कशाला आरडाओरड करताय,तुम्हाला पाहता येत नाही का?चांगले डोळे आहेत की मोठ मोठे.

मोहन: सकाळी-सकाळी दिवसाची सुरुवात खराब करू नकोस.

वनिता: बरं बरं…..(असे म्हणून नाक तोंड मुरडत स्वयंपाक घरात निघून जाते.)

(मोहन घाईगडबडीने बूट घालून आपल्या कामाला जातो.पण मनात विचार करत होता,दिवसभर राब राब कंपनीत राबायचं आणि सकाळी संध्याकाळी घरी सुख मिळल,या आशेवर राहायचं तर ईथही कटकट.घरात वनिताच्या डोक्यातही विचारांचं काहूर,काय नुसती रोज बडबड,हे नाही केलं?ते नाही दिलं?मी काय मोलकरिन आहे का?फक्त यांची सेवा करायला.दिवसभर पोराचं काम,अन सकाळ संध्याकाळ यांची बडबड,मला पण स्वतःच काही जीवन आहे की नाही?दोघेही दिवसभर मनोमन एकमेकांचे उणेदुणे काढत असतात.तोच विचार त्यांच्या मनात दिवसभर गिरक्या घेत राहतो.सायंकाळी कंपनी सुटल्यावर मोहन घरी येतो,अन् पाहतो तर घरात सर्वत्र अस्तव्यस्त पडलेले कपडे,सगळीकडे अस्वच्छता.निमूटपणे संध्याकाळचे जेवण करतो आणि झोपी जातो.असे रोजच चालू राहते.दोघेही एकमेकांशी धड नीट बोलत नाहीत.की प्रेमाने विचारपूस करत नाहीत.)

मोहन: वनिता आज रविवारची सुट्टी आहे.कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आपण.तेवढाच थोडासा विरंगुळा.

वनिता: नको,माझ्यामागे भरपूर कामं आहेत,तुम्ही जा आपले एकटे.

मोहन: बऱ्याच दिवसापासून पाहतोय मी,तुझं चित्त काही थाऱ्यावर नाही.ही भाजी नको करू म्हटलं तर तीच करणार.काही सांगितलं तर फक्त ऐकून घेणार,करणार मात्र काहीच नाही.काय चाललय तुझ्या मनात,ते तरी सांग.आपण दोघे इथं बाहेर शहरात राहतोय.एकमेकांची काळजी घेतली पाहिजे.ते तर बाजूलाच,तू साधी बोलायलाही तयार नाही.

वनिता: काय बोलायचं,तुम्हाला बायको नको फक्त काम करणारी कामवाली पाहिजे होती,तर लग्नच कशाला केलं?मी सगळं काम निपटायचं,कधी प्रेमाचं बोलणं नाही,की कुठे बाहेर फिरायला नाही.फक्त आणि फक्त ह्या घरात गाडून घ्यायचं.आपलंच मेलीचं नशीब फुटकं,काय कुणाला बोलण्यात अर्थ आहे.

मोहन: म्हणजे तुला काय म्हणायचं,मी तुझ्यासाठी काय करत नाही? हे सगळं कुणासाठी चाललंय?आपला पृथ्वी आणि तू,तुम्हा दोघांसाठी तर सर्व काही करतो आहे.



वनिता: हो कळलं,तुम्ही किती करता आमच्यासाठी.

(असेच बरेच दिवस दोघांचेही मनं धूसपुसत राहतात.कुणी कुणाशी नीटपणे बोलत नाही.घराला घरपण राहत नाही. दोघांनाही एकमेकाबद्दल प्रेमाऐवजी तिरस्कार वाटू लागतो.एके दिवशी वनिता आपल्या आईला फोन लावून सर्व हकीकत सांगू लागते.)


वनिता:(आईला फोन लावते) हॅलो,आई मी वनिता बोलते.

जोशी बाई: वनिता बोल काय म्हणतेस? मोहनची कंपनी काय म्हणते?पृथ्वी कसा आहे?

वनिता: अग काय सांगू तुला, लग्नाच्या वेळी तू तर म्हटली मोहन फार चांगला मुलगा आहे.तुझं नशीब उघडलं वनिता.कसलं आलंय नशीब.मोहन रोज नुसता बडबड करत असतो,बांबूतल्या भुंग्यासारखा आवाज चालूच.लग्नापासून काय काय आणि किती सहन केले ते माझ्या जीवाला माहित.घरी आला की कधी शांत बसत नाही.ते नाही केलं,हे नाही केलं?असं केलं?तसं का केलं?आई मी फार वैतागून गेले बघ,यांच्या कटकटीला.एक दिवस मी माझ्या जीवाचं काही तरी करीन,तेव्हाच मला शांती मिळेल असं वाटतंय.

जोशी बाई: हे बघ वनिता लई टेन्शन घेऊ नको,आम्ही आहोत तोपर्यंत तू बिंदास राहा.तुला जे काही कमी पडेल ते आम्हाला मागत जा,आमच्या दोघांचा लाखभर पगार येतो घरात.सुट्टीच्या दिवशी आम्ही येतो तुझ्याकडे,मग चांगलीच मोहनची कानउघडणी करू.समजतो काय स्वतःला.बरं आता मी शाळेत निघाली आहे,आपण नंतर बोलु,ओके बाय.

(एके दिवशी रविवार गाठून जोशी सर व बाई दोघेही वनिताकडे येतात.मोहन व वनिता दोघांनाही सर्व हकीकत विचारतात.)

वनिता: अग आई,हे माझ्याकडून फक्त काम करून घेतात.जसे यांनी पत्नी नाहीतर कामवाली म्हणून आनलय या घरात.

मोहन:(चांगलेच खडे बोल सुनावतो)अहो हिला पत्नीचे कर्तव्य सुद्धा समजत नाहीत,नवऱ्यासाठी काय केलं पाहिजे,काय करू नये.कसंही वागायचं.मान,मर्यादा सर्व वेशीला टांगायचं,हे असं चालतं का तुमच्याकडे,सासुबाई.

जोशी सर: हे पहा नवरा-बायको म्हटल्यानंतर किरकोळ वाद-विवाद चालूच असतात.जखम झाल्यावर तिला वाढू न देता त्यावर वेळीच फुंकर घातली तर ती लवकर बरी होते.त्या जखमेवर तुम्ही सारखे घाव घालत राहिलात,तर जखम मोठी होऊन कधीकधी जखम झालेला अवयव काढून टाकावा लागतो. त्यासाठी प्रत्येक गोष्टीत खबरदारी घेणे गरजेचे आहे.कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त झाली तर नक्कीच त्याचा वेगळा परिणाम जाणवतो.

जोशी बाई: अहो बास करा,मोहनरावांना ती गोष्ट कळायला नको का?

मोहन: म्हणजे मीच सगळं समजून घ्यायचं, वा धन्य आहात आपण व आपली मुलगी.

जोशी बाई: ते काहीही सांगू नका,घरकाम करण्यासाठी एखादी कामवाली लावा,तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही पाठवून देऊ,पण हे असलं खपवून घेतलं जाणार नाही.

मोहन: तुमच्या असल्या वागण्या-बोलण्याने,तर तिला चांगलीच फुस मिळते.बोला बोला म्हणजे चांगली माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटील रोज.

वनिता: पाहिलं ना आई-बाबा, हे असं यांच रोजच चालू असतं. एवढ्या दिवस मी सहन केलं,पण आता मला सहन होत नाही.

जोशी बाई: जाऊदे सगळं चुलीत,चल तुझी बॅग भर,आमच्याकडेच राहा,यांना खाऊदे हाताने तुकडे करून,त्याशिवाय काही वठणीवर येणार नाहीत.

मोहन: (रागात)हो जा जा.

(वाद अगदीच विकोपाला जातो,वनिता आई-बाबांबरोबर माहेरी येते.दिवसांमागून दिवस लोटले जातात,पण दोघांचाही एकमेकांना कुठला फोन नाही,की काही बोलणे नाही.जोशी बाई व सर हे फार रागातच असतात.दोन-तीन महिने लोटल्यानंतर जोशी बाई म्हणतात पाहिलं का त्याला तुझी गरज नाही राहिली.नाहीतर आला असता नाक घासत आपल्याकडे.जोशी बाई एका वकिलामार्फत मोहनला नोटीस पाठवतात,आमच्या मुलीला तुमच्या बरोबर संसार करताना खूप अत्याचार सहन करावा लागतो.तिची खूप पिळवणूक केली जाते.आणि तसे पाहता तुम्हाला तिची आता गरजही राहिलेली दिसत नाही.आपल्या असल्या वागण्याला कंटाळून तिने तुमच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे,त्याकरिता हा अर्ज पाठवला आहे.त्यावर सही करून तिला आपली परवानगी द्या.मोहन त्याचे आई-वडील सर्वजण त्यांची समजूत घालायला येतात,विनवणी करतात,पण सर्व गोष्टी अपयशी ठरतात.भांडण न्यायालयात जाते.न्यायालयही प्रथम दर्शनी त्यांना एकत्र राहावे,अशी विनंती करते.मात्र वनिताच्या आई-वडिलांचा पैसा त्यांना शांत बसू देत नाही.त्यांना वाटतं आमच्याकडे काय कमी आहे,आम्ही आमच्या लेकीचा व नातवाचा सांभाळ चांगल्याप्रकारे करू शकतो.शेवटी न्यायालयाकडून त्यांच्या जिद्दीपाई दोघांना वेगळे केले जाते,त्यांची फारकत होते.पृथ्वी लहान असल्यामुळे त्याला त्याच्या आईकडेच ठेवण्यात येते.लग्नामध्ये ज्या वस्तू दिल्या होत्या,त्या सर्व वनिताने माहेरी आणल्या तरी चालतील,हे स्पष्टपणे सांगितले जातो.वनिता व तिची आई टेम्पो घेऊन पसारा आणण्यासाठी जातात.टेम्पो दारापुढे उभा करतात.सोबत हमालही आणलेला असतो.)

जोशी बाई: (दारापुढे उभ्या राहून दरवाजा वाजवतात.) कोण आहे का घरात?

मोहन: हा कोण? सासुबाई.

जोशी बाई:(मोहनकडे रागाने पाहत)सासुबाई म्हणण्याचा अधिकार तुम्ही केव्हाच गमावून बसलात.आम्ही सामान नेण्यासाठी आलो आहोत.लग्नामध्ये दिलेले आणि वनिताचे जे काही असेल ते आम्ही घेऊन जाणार आहोत.

मोहन: घर उघडेच आहे,जे न्यायचं असेल ते घेऊन जा.

(जोशी बाई एकेक वस्तू घेऊ लागतात.वनिताचा मात्र हात धजावेना,जे दोघांनी एकत्र उभं केलंय,ते आता एकटीने घेऊन जायचं,या विचारानं ती कासावीस झाली.घरात आल्याबरोबर सहा महिन्यांपूर्वीच्या तिच्या सर्व जिवंत आठवणींना उधान आलं.मन गहिवरलं,गेल्या तीन-चार वर्षात दोघांनी मिळून संसारात जे काही जमवलं होतं,आता त्या सगळ्या एकत्र गोष्टी वेगळ्या होणार,या विचारानं तिच्या नयनांना प्रेमधारा लागल्या होत्या.तिघांचा एकत्र काढलेला फोटो टीव्ही वर ठेवलेला पाहिल्यावर तिला कळाले,की बाकी सगळ्या घरात जळमटं झालीत,पण फोटो मात्र स्वच्छ पूसून ठेवलेला दिसत होता.वनिता हे सर्व पहात होती.किती पहावे आणि किती डोळ्यात साठवावे,याचा मोह तिला आवरता येईना.तितक्यात जोशी बाई वनिताला आवाज देतात.)


जोशी बाई: अगं काय करतेस,मी तीन-चार वस्तू खाली नेऊन दिल्या आणि तू आणखी तिकडेच उभी आहेस.

वनिता: हो आले,सामान काढत होते.

(पुन्हा ती आपल्या विचारात मग्न झाली.का कुणास ठाऊक पण तिचे मन तिला आता सांगत होते.वनिता तू फार मोठी चूक केली आहेस.आयुष्यात प्रेमाच्या माणसाचा सहवास गमावला आहेस.अगं जीवन हे कष्टमयच असतं.पण त्याच्यात रंग भरायला प्रेमाची माणसं नसतील,तर त्या निरंक जीवनाला तरी काय अर्थ आहे.अचानक तिची नजर मोहनकडे गेली,सहा महिन्यापूर्वीचा सशक्त मोहन आज अशक्त झालेला तिला जाणवला.मागच्या दिवाळीला माझ्या हट्टाखातर मोहन व मी नवीन एलसीडी टीव्ही घेऊन आलो होतो.पैसे कमी होते,तर मोहनने स्वतःची अंगठी बँकेत तारण म्हणून ठेवली होती.दोघं सोबत गेलो आणि माझ्या पसंतीचाच टीव्ही खरेदी केला होता.टीव्हीचा रिमोट सदैव माझ्याजवळ असायचा.पण आज टीव्ही आणि रिमोट दोघेही धूळखात पडले आहेत.माझ्याकडे रागाने पाहत जणू मला बोलतच होते.अग किती दिवस साथ दिली आम्ही तुम्हाला,दोघांनी मिळून आम्हाला घरात आणलं आणि आज मोहनपाशी आम्हाला एकटं सोडून चाललीस.किती स्वार्थी आहेस,काय तर फक्त कष्टापाई.अगं आम्ही निर्जीव वस्तूसुद्धा कधी कुणाला सोडून देत नाहीत.म्हणे माणसं भावनिक, संवेदनशील असतात,मग मानव आसूनसुद्धा तू अशी भावनाशून्य कशी झालीस,हेही आम्हाला कळेना.एवढा चांगला घरसंसार बसलेला क्षणात तू होत्याचं नव्हतं केलं,काय मिळवलं आयुष्यात हे सर्व करून'सुख'..!अगं सुख हे,स्वतः कमावून दुसर्‍याला घास भरवण्यात आहे.दुसऱ्यासाठी खूप काही करणं यातच फार मोठा आनंद असतो आणि तो आनंद,समाधान यापासून तू खऱ्या अर्थाने आज पोरकी झालीस‌.कुठल्याही समारंभाला एकत्रितपणे गेले तर त्यातच खरा मोठेपणा आणि समाधान आहे.तेथे अंगावर भरमसाठ अलंकार जरी घालून गेलीस,तरी शेवटी एकटेपणाचे दुःख सोबत असणार.जीवनात जोडीदार नसण्याची किंमत त्यावेळेस कळेल.स्त्रीच्या आयुष्यातला खरा अलंकार तर तिचा पती असतो.तो आज तू गमावला आहेस.
       अचानक मोहनची नजर वनिताकडे गेली.दोघांनी एकमेकांकडे पाहिले.क्षणात त्यांचे डोळे प्रेमाची भाषा बोलू लागले.डोळ्यांनी एकमेकांना हळुवारपणे आलिंगन दिले होते. त्यांच्या जीवनातील पूर्वीच्या आठवणींना डोळे उजाळा देऊ लागले.तीन-चार वर्षाच्या प्रवासातल्या किती किती नव्हे त्या आठवणी आज जिवंत झाल्या होत्या.डोळ्याद्वारे वनिताचे मन केव्हाच मोहनच्या मिठीत गेले होते.कित्येक वेळा एकमेकांचा हात प्रेमाने हातात घेऊन सुखदुःखाच्या गुजगोष्टी केल्या होत्या.एकमेकांच्या साथीने कैक संकटांना निधड्या छातीने सामोरे जाण्याचे बळ मिळत होते. 
           जीवनरुपी समुद्रात वाहत जाणाऱ्या दोन ओंडक्यांनी काही काळासाठी एकमेकांना साथ दिली,पण आज अचानक फारकत नावाच्या तुंबळ लाटेनं जेव्हा ते वेगळे होत होते,तेव्हा एकमेकांकडे आसुसल्या नजरेनं व्याकूळ होऊन पाहत होती.की आता आपली भेट पुन्हा कधी?हे आता कुणाला माहीत?लग्नाच्या सात जन्माच्या फेऱ्यांनी एकत्र बांधलेल्या दोन जीवांना काही वर्षातच वेगळं केलं होतं.मोहनचे डोळे वनिताच्या डोळ्याशी अधीरतेने बोलत होते,नको जाऊ सोडून हा सर्व संसार,नको करू हेळसांड त्या चिमुकल्या जीवाची.

जोशी बाई: अगं वनिता, चल खुप उशीर झालाय…

वनिता:(डोळे पुसत) हो…..

(वनिताचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.आपण फार मोठी चूक केल्याचे दुःख तिला जाणवत होते.जड अंतःकरणाने दरवाजातून बाहेर निघत असताना,बाजूलाच बसलेल्या मोहनच्या खुर्चीला वनिताचा पदर अडकला.कदाचित तो सांगत होता,की माझी गाठ याच्याशीच बांधलेली आहे,नको ती जबरदस्तीने तोडायचा प्रयत्न करू.फारकत नावाच्या लाटेनं जरी आज त्यांना वेगळं केलं असलं,तरी मनाने मात्र ते वेगळे होऊच शकले नाहीत,कायमचे एकच राहिले....)


              लेखक,
       श्री.अजिनाथ सासवडे (सर)
        मु.पो.लोणी(स),आष्टी
        मो.९४२१३३६०५९
        

Wednesday, February 5, 2020

माझा महाराष्ट्र महान

"माझा महाराष्ट्र महान"


       मराठी मायबोली असलेला शूरवीर मावळ्यांचा प्रांत म्हणजेच आपला महाराष्ट्र.महाराष्ट्राची अगदी प्राचीन काळापासून पराक्रमी लोकांचा वारसा लाभलेला प्रदेश म्हणून ख्याती आहेत.दऱ्याखोऱ्यातील मावळ मातीतील उमद्या मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक या मातीवर झाला,तेव्हा कुठे ही भूमी गुलामीतून मुक्त झालेली आहे.महाराष्ट्राची भूमी संतांचे थोर कार्य आणि विवेकी विचाराने पवित्र झालेली भूमी आहे.संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत गाडगे महाराज,संत एकनाथ महाराज,संत जनाबाई ह्या थोर संतांच्या विचार व वाणीने महाराष्ट्राला पवित्र आणि मंगल केले आहे.हिंदू,मुस्लिम,सिख,इसाई अशा विविध धर्माचे आणि अठरापगड जातीचे लोक आज या ठिकाणी गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.अशा प्रकारे विविधतेतील एकता या ठिकाणी पहावयास मिळते.
            छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांसारखे महापुरुष या महाराष्ट्र देशांमध्ये धर्म रक्षणार्थ तथा धरणी मातेच्या उद्धारासाठी जन्मास आले.जगावे कसे हे शिवरायांनी जगाला आपल्या आचरणातून दाखवून दिले,तर मरावे कसे हे संभाजीराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.कैक परकीय सत्तांनी या महाराष्ट्रावर अत्याचार केला,पण त्याचा बीमोड करण्यासाठी येथे थोर महापुरुषांनी जन्म घेतला.इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच,डच तसेच मोगल,कुतुबशाही,आदिलशाही या सर्वच सत्तांनी महाराष्ट्राला अजगरासमान गिळंकृत करू पाहिले.पण गरुडाप्रमाणे उत्तुंग भरारी घेणारा हा महाराष्ट्र,कधी कुण्या परकीय आजगररूपी सत्तेपुढे नमला नाही,उलट त्यालाच आपल्या पंजात पकडून त्याचे नामोनिशान मिटवणारे शूरवीर या मातीत निपजले.महाराष्ट्र हा कणखर मनाच्या आणि निधड्या छातीच्या शूरवीर मावळ्यांचा.सुवर्ण अक्षरात ज्यांचा इतिहास लिहून ठेवावा अशी माणसे या मातीत जन्माला आली आणि मातीसाठी लढता लढता त्यांनी वीरमरण पत्करले.कितीही अन्याय,अत्याचार झाले तरी सर्व अत्याचारांना मोडीत काढणारा महाराष्ट्र नक्कीच अभिमानाने आज उभा आहे.
            शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचे या मातीत बीजारोपण झालेले आहे आणि आज त्याच विचारांचा वटवृक्ष अभिमानाने ताठ उभा आहे.मराठी मातीतल्या प्रत्येक माणसाच्या मनात शिवविचारांचा जागर रोजच होत असतो. महाराष्ट्रातील प्रगल्भ विचारांचा वसा लाभलेला माणूस अन्यायापुढे कधी झुकला नाही,की कुणापुढे नमला नाही.तो वंदन करतो फक्त धरणीमातेला आणि भगव्याला.
         महाराष्ट्राला विविध थोर कवी,लेखक,साहित्यिक यांचा वारसा पूर्वापार लाभलेला आहे आणि त्यांच्या सडेतोड लेखनीने दीनदुबळ्या,तळागाळात खितपत पडलेल्या समाजाचा उद्धार होऊन तो आज विकासाच्या मार्गावर रूढ झाला आहे.समाजाच्या विकास प्रक्रियेत या लोकांनी मोलाची पायाभरणी केली आहे.
       स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच मातीत जन्म घेतला आणि अखंड देशातील स्त्रीयांना शिक्षणाची गंगा खुली केली.शिक्षणाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्त कधी कुणापुढे नतमस्तक होत नाही,हे महात्मा फुले यांनी ठणकावून सांगितले.आज याच महाराष्ट्राची संपूर्ण देशातच नव्हे नव्हे तर विश्वात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख आहे.संपूर्ण जगातून आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात.संगणक क्षेत्रात घडून आलेली क्रांती याच महाराष्ट्रातील विजय भटकर नावाच्या युवकानी घडवून आणली.
       संपूर्ण देशात सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,औद्योगिक सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर पाऊल टाकत आले आहे.उद्योगधंदे,व्यवसाय,शेती,शिक्षण,माहिती तंत्रज्ञान,विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध तज्ञांनी देशासाठी मोलाची कामगिरी केली आहे.पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र नक्कीच आज देशाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो.मुंबईसारखे जागतिक उंचीचे शहर महाराष्ट्रात खुमासदारपणे उभे आहे.भारत देशाचे प्रवेशद्वार'गेटवे ऑफ इंडिया'महाराष्ट्रातच आहे.भारताची आर्थिक राजधानी अर्थातच मुंबई महाराष्ट्रात आहे.देशातले जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून दिल्लीनंतर आज मुंबईच नावारूपाला येऊ पाहत आहे.
          महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरडोई अन्नधान्य उत्पादन निश्चितच जास्त आहे.शेती क्षेत्रातही हरितक्रांतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून मराठी माणसाने भरपूर प्रगती केली आहे.जगातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अन्नधान्य,फळे,भाजीपाला इत्यादी उत्पन्न निर्यात होत आहे.फुलशेती,फळशेती ही तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नगदी रक्कम तयार करून देणारी आहे.दुग्धव्यवसायात धवलक्रांती होऊन दूध उत्पादनात भरमसाट वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.
          शिक्षण क्षेत्रातही महाराष्ट्र वरच्या स्थानावर आहे.आज सक्तीच्या शिक्षणामुळे तळागाळातील दीनदुबळ्या लोकांनाही शिक्षण मिळू लागले आहे आणि या सर्व शिक्षणाच्या चमत्कारामुळे महाराष्ट्र प्रगतीच्या द्रुतगती मार्गावर विराजमान आहे.आज शिक्षण घेऊन आपलीच महाराष्ट्रातील मुलं बाहेरच्या देशात चांगल्या प्रकारचे काम करून नावलौकिक मिळवत आहेत.
       महाराष्ट्रातील देहू,आळंदी हे आज अध्यात्माचे विद्यापीठ म्हणून ओळखले जातात.महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून अध्यात्माचे धडे गिरवण्यासाठी अध्यात्मप्रेमींची आज देहू,आळंदीमध्ये रेलचेल दिसून येते.तुळजापूर,पंढरपूर,कोल्हापूर,त्र्यंबकेश्वर,पैठण,देहू,आळंदी,माहुरगड,सप्तशृंगी अशी सगळी मराठी माणसांची कुलदैवतं येथे एकवटलेली आहेत.लोकनाट्य,तमाशा,कोळीगीत,पोवाडे,भजन,कीर्तन अशा विविध पारंपारिक लोककला महाराष्ट्रात आजही जीवंत आहेत.महाराष्ट्रातील जनतेचा पेहराव हा अतिशय रुबाबदारपणाचा आहे.महाराष्ट्रातील माणसं ही डोंगरदऱ्यात,कडेकपाऱ्यात राहणारी अगदी दगडासारखी कणखर आहेत.एकमेकांबरोबर रोज भांडतील पण संकट आल्यावर मात्र एकमेकांना मदतीचा हात द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत,हीच खरी मराठी माणसं आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हटलं,म्हणजे विश्वासाचे प्रतीक.मराठी माणूस म्हटलं की शौर्याची निशानकाठी हाती घेतलेला.कुठल्याही क्षेत्रात पराक्रम गाजवावा तो याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनं.संरक्षण दलामध्ये तर महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी मराठाबटालियन सुद्धा उभी केलेली आहे.याचा अर्थ महाराष्ट्रातील माणूस शूरवीर,पराक्रमी,निडर अशीच त्याची ख्याती संरक्षण क्षेत्रांमध्येही आहे.हसत हसत मरण पत्करीन पण शत्रूला शरण जाणार नाही,की कोणाची लाचारी पत्करणार नाही,हा खरा मराठी माणूस.
        शेती,उद्योगधंदे सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने भरपूर प्रमाणात प्रगती केली आहे.कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे मोठंमोठे उद्योगधंदे आज महाराष्ट्रामध्ये उभारले आहेत.त्याद्वारे कित्येक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाचे स्थिरीकरण झाले आहे.मोठंमोठ्या नद्यांवर बांधलेल्या धरणामुळे शेतीसाठी तसेच कारखान्यासाठी पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.पाण्यावरच विद्युत निर्मितीमुळे विजेचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.
           आज महाराष्ट्रातील महिलाही सर्वच क्षेत्रात पुढे सरसावल्या आहेत.विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला दिसत आहे.विविध प्रकारचे उद्योगधंदे असतील,संरक्षण दल असेल,किंवा परिवहन मंडळ असो सर्व क्षेत्रात महिला आज आपले कार्य नेटाने पुढे चालवत आहेत.खाजगी क्षेत्र असो वा सरकारी,महिला आज आपलं अमूल्य असे योगदान देताना दिसत आहेत.राजमाता जिजाऊ भोसले,अहिल्यादेवी होळकर,सावित्रीबाई फुले,सिंधुताई सपकाळ,प्रतिभाताई पाटील अशा थोर स्त्रिया याच महाराष्ट्रात जन्मास आल्या.महाराष्ट्राचे नाव त्या आकाशाच्या उंचीला भिडावे इथपर्यंत घेऊन गेल्या.अशा सर्व गोष्टीत सुजलाम-सुफलाम,प्रगती पथावर रूढ असलेल्या महाराष्ट्राने,देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपले नावलौकिक मिळवले आहे.म्हणूनच अभिमानाने महाराष्ट्र भूमीला म्हणावेसे वाटते,"वंदे मातरम्,वंदे मातरम्"..!


                लेखक,
         श्री.अजिनाथ सासवडे (सर)
          मु.पो.लोणी(स),आष्टी
          मो.९४२१३३६०५९.

Wednesday, January 22, 2020

मोबाईल एक व्यसन

"मोबाईल एक व्यसन"

         एखाद्या गोष्टीच्या अति आधीन जाणे म्हणजेच व्यसनाधीन होणे.चांगले असो अगर वाईट,परंतु प्रमाण जास्त वाढले म्हणजे त्याचे रुपांतर व्यसनात झाले.मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने बायकोला बेदम मारले,ही बातमी टीव्हीवर पाहिली आणि या मोबाईल नावाच्या मानवचलित यंत्राने माणसाच्या जीवनात केलेल्या आगमनाने माणसाला लागलेले त्याचे व्यसन,हे नक्कीच जीव घेणे आहे,असे वाटू लागले.ज्या महापुरुषाने मोबाईलला जन्मास घातले तो धन्य.मोबाईलचे वाढते चमत्कार दिवसेंदिवस लक्षात येऊ लागले.हा दिसतो लहान पण भल्याभल्यांनाही वेडं करून सोडलय यानं.वरवर दिसायला फूलपाखरासारखा पण आतून मात्र गांधीलमाशी समान.कुणाच्या भावनांना कुठे दंश करील आणि कुठे त्या उत्तेजित होतील याचा भरवसा नाही."लहान तोंडी मोठा घास"असा याचा स्वभाव.कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशास कारणीभूत ठरतो.तद्वत आज मानवी पिढ्याबद्दल झाले आहे.लोक एकवेळ पायात चप्पल घालायची विसरतील,अंगात शर्ट घालायला विसरतील,पण मोबाईल मात्र हातात किंवा खिशात असल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकण्यास धजावणार नाहीत आणि चुकून मोबाईल जर विसरला तर आयुष्याचा जोडीदार हरवल्यागत हुरहूर मनाला लागावी,एवढा प्रत्येकाला याचा लळा लागला आहे.या निर्जीव वस्तूनं माणसाला प्रमाणापेक्षा जास्त आपलंसं केलं आहे.लोकांना अन्नपाण्यापेक्षाही याचा मोह जास्त वाढू लागला आहे.काय किमया केली या छोट्याशा वस्तूनं की लहान थोरांना पूर्ण बिघडून ठेवले आहे.
      मोबाईलचा इतिहास पाहिला तर तीन दशकांपेक्षा जास्त नाही.सुरुवातीच्या काळात फक्त एकमेकांशी संवाद साधन्यापुरता मोबाईलचा वापर होत होता.जसजसा मोबाईल कात टाकत गेला तसतसा त्याचा वेग जास्तच वाढत गेला.आज सगळं जग या छोट्या वस्तूंमध्ये सामावलं आहे.लेखन,वाचन,टीव्ही,रेडिओ,एवढेच नव्हे तर संगणकाचे कामही आज मोबाईल करत आहे.हा अविश्वसनीय बदल झाल्यामुळेच मोबाइलला हल्ली स्मार्टफोन हे आधुनिक नाव देण्यात आले.अल्पावधीतच सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा एक किमयागार ठरला आहे.ज्या ठिकाणी माणूस,त्या ठिकाणी मोबाईल.मोबाईल शिवाय माणूस हे समीकरण आज होऊच शकत नाही.माणसाला त्याची सावली जशी सोडत नाही,अग्नीला उष्णता सोडत नाही,तसा मोबाईल पासून माणूस क्षणभरही वेगळा राहू शकत नाही.आनंद असो अगर दुःख,कुठल्याही प्रसंगी आपल्याला साथ देतो,हा याचा एक सद्गुणच म्हणावा लागेल.संवेदनाहीन असला तरी संवेदनशील माणसांच्या हृदयाला पाझर फोडण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे.चोर-पोलिसांचा खेळ खेळण्यात मोबाईल फारच पटाईत.खोटं बोलण्याचे प्रशिक्षण घ्यावं ते मोबाइल कडूनच.
             मोबाईलमुळे माणसातला माणूस हरवला आहे.माणसात असून एकटेपणाचा गुण मोबाईलने माणसाच्या अंगी बानवला आहे.उठताना मोबाईल,बसताना मोबाईल,खाताना मोबाईल,चालताना मोबाईल, गाडीवर मोबाईल,अहो एवढेच काय तर बाथरूममध्येही मोबाइल,हा तर अतिरेकपणाचा कळस झाला.कोणत्या वस्तूच्या किती आहारी जावं,हे मात्र माणसाने विचार करण्यासारखं आहे.थोडा जरी वेळ मिळाला तरी काढला मोबाईल की लागलेच पहायला.जे सुरुवातीच्या काळात दळणवळण तथा संदेशवहनाचं साधन होतं,आज तेच मृत्यूच्या खाईपर्यंत घेऊन जाणारं साधन झालं आहे.
      आज मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सने खूप धुमाकूळ घातला आहे.पब्जीसारख्या गेमने तर कित्येकांना मृत्यूच्या स्वाधीन केले आहे.काहींनी गेम खेळू दिली नाही म्हणून आपल्या जवळच्यांचा घात केला आहे.मोबाईल दळणवळणाचे साधन राहिले नसून मृत्यूचा एक सापळाच झाला आहे.मोबाईलचा वापर किती करावा याला काहीच मर्यादा उरली नाही.मोबाईलचा अवाजवी वापर आज सर्वांच्याच विनाशाला कारणीभूत ठरत आहे. सतत मोबाईलकडे पाहिल्याने डोळ्यावर होत असलेले विघातक परिणाम काहींना जाणवू लागले आहेत.डोळ्यांना नंबर लागणे,दिसण्यास कमी होणे,मोबाईलमुळे कितीतरी मनोरुग्ण सुध्दा झालेली आहेत.
      मोबाईलमुळे माणसाला एकलकोंडेपणा चिकटला आहे.कुणाशी कसला संवाद नाही.त्यामुळे प्रेम,आपुलकी,सहानुभूती या प्रत्येकाच्या भावना अतृप्तच राहत आहेत.एकमेकांबरोबरचे संवाद,संभाषण कमी झाले.परिणामी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणे,त्याला आपले मानने,या गोष्टी आज दुरापास्त झाल्या आहेत.एखाद्याला आजारपणात भेटायला गेल्यावर आजारी व्यक्तीची चौकशी करण्याऐवजी स्वतःच्या मोबाईलमध्येच मानसं दंग होऊन बसतात.मोबाईलच्या अतिरेकामुळे कानाचेही आजार उत्पन्न झाले आहेत.
       पूर्वीच्या काळी परगावी काही काम असेल तर पत्रलेखन अथवा त्या गावी जाऊन निरोप दिला जात असे.काळ बदलल्यामुळे आज ती गरज राहिलेली नाही.आजच्या पिढीचा गैरसमज आहे कि मोबाईलमुळे आपला वेळ वाचतो,परंतु वाचलेल्या वेळेचा आपण किती सदुपयोग करतो,हे महत्त्वाचे आहे,कारण क्षणात मोबाईलद्वारे निरोप देऊन आपण मोकळे होतो खरे,पण बाकी वेळ आपण सत्कारणी लावतो का?काम न करता नुसते बसून कुठला शारीरिक व्यायाम नाही,की कसले कामही नाही.त्यापेक्षा परगावी जाऊन निरोप दिला तर शारीरिक व्यायाम होत असे.एकमेकांबद्दल प्रेम,आदरभाव वाढत असे.
           घरामध्ये सगळ्यांकडे जर स्मार्टफोन असेल तर घरात कसलाही संवाद घडून येत नाही,जो तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त,त्या घरातलं घरपण हरपून जातं.एकत्र बसून संवाद साधल्याने अविर्भाव,प्रेम नक्कीच वाढीस लागतो.विचारांची देवाण-घेवाण होते.एकमेकांचा आदर सन्मान केला जातो.जिव्हाळा उत्पन्न होतो.मोबाईल हा आज एक स्लो पॉयझन सारखा झाला आहे.याचे वाढते प्रमाण एक दिवस माणसाला विनाशाकडे घेऊन जाणार आहे.मोबाईल पाहण्याचा,बोलण्याचा,वापरण्याचा काहीतरी वेळ असावा.पण दुर्दैवाने इतर काम आपण थोड्या प्रमाणात करतो आणि दिवसातला बराचसा वेळ मोबाईलच्या दुनियेतच रममाण होतो.मोबाईलचा ना कुठला शारीरिक फायदा,ना मानसिक.मानसिक स्वास्थ्य मात्र नक्कीच मोबाईलमुळे बिघडले जात आहे.
        आता तर नेटवर्क कंपन्यांनी देऊ केलेला डाटा संपविण्यासाठी जशी पाहणारांची आणि मोबाईलच्या बॅटरीची स्पर्धाच आहे.कोण लवकर कंटाळतोय.हे जसे एकमेकांशी चुरस लावतात. अन लिमिटेड व्हॉइस कॉल यामुळे लोक आपले काम सोडून फोनवर तासनतास बोलत राहतात. काय बोलावे याचेही लिमिट राहिले नाही.फक्त अमर्यादित मिळतय म्हणून कसाही वापर करायचा,हा माणसाचा मूळ स्वभावगुण."फुकटचं घावलं अन बाप लेक धावलं"अशी गत झाली लोकांची.त्याचा आपल्या जीवन मानावर विघातक परिणामा बरोबरच आपला अमूल्य वेळही आपण त्यासाठी विनाकारण खर्ची घालत आहोत,याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
         मोबाईलनं लोकांना"विनाशकाले विपरीत बुद्धी"असं झालंय.लोकांची बुद्धीसुद्धा बिथरली.अगदी वयोवृद्ध मंडळी सुद्धा याला अपवाद राहिली नाही.मोबाईलसारख्या एवढ्या छोट्या वस्तूनं आज मानवाचा एवढा विकसित मेंदू असूनही त्यावर कब्जा मिळवला आहे.मग प्रश्न असा पडतो,की मानवाने मोबाईलला निर्माण केले,की मोबाईलने मानवाला.आपण तयार केलेल्या वस्तूच्या आपण आधीन जात असू तर आपल्या बुद्धीची वाटचाल कुठे होते आहे,हेही ध्यानी घ्यायला हवे.आपणच निर्माण केलेली वस्तू आपल्यासाठी हानिकारक ठरत आहे.या व्यसनातून बाहेर येण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.नाहीतर घोडामैदान समोरच आहे आणि त्याचे परिणाम अल्पावधीतच प्रत्येकाला कळणार आहेत.त्याकरिता आपला सावध पवित्रा असावा म्हणजे ही एक भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूलच आहे.मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा‌.अनावश्यक फोटोज,व्हिडिओज,पोस्ट टाकणे आणि पाहणे टाळावे.विनाकारण फालतू गेम खेळत बसणेही नक्कीच धोक्याचे आहे.जवळजवळ बहुतांश व्यक्ती या व्यसनात अडकून पडल्यामुळे एक दिवस आपले स्वास्थ्य गमावून बसणार आहेत.त्याकरता वेळीच खबरदारी घ्यावी.आजपासूनच चारतास मोबाईल पाहणाऱ्यांनी दोन तास,दोन वाल्यांनी एक तास वापरावा,तर एक तास पाहणारांनी अर्ध्या तासात कसं आटोपते घेता येईल याचा प्रयत्न करावा.तरच आपण भविष्यात आनंदी आणि समाधानी जीवन जगू व इतरांनाही जगू देऊ हे निश्चित आहे.


                 लेखक,
          श्री.अजिनाथ सासवडे (सर)
           मु.पो.लोणी(स) आष्टी,
           मो.९४२१३३६०५९

Tuesday, January 21, 2020

जीवन

"जीवन"
     🖕येथे टच करू नका.)

       जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचा कालखंड ढोबळमानाने आपण जीवन म्हणून ओळखतो.प्रत्येकाची जीवनाची परिभाषा वेगवेगळी असते.सौख्य प्राप्तीसाठी प्रत्येकजण कसोशीने प्रयत्न करत असतो.जीवन प्रवासात प्रत्येकाला चढउताराचा अनुभव येत असतो.कधी कुणाला सुरुवातीच्या काळात काही गोष्टी सहजच प्राप्त होतात,तर कुणाला उतरत्या काळात जीवन सुखासाठी नियतीशी झगडावे लागते.जेवताना सुरुवातीच्या घासाला खडा लागावा आणि मग इतर घासही भीत भीत घ्यावे अशीच काही अवस्था जीवनामध्ये होते.काळ वाईट असो अगर चांगला,पण प्रत्येक परिस्थितीत कणखरपणा अंगी बाळगणे निश्चितच हितकारक ठरते.कामापुरते मामा भरपूर असतात परंतु,प्रत्येकालाच आपल्या जीवन प्रवासात नातलग,मित्र तथा स्वकीयांची साथ मिळेलच याविषयी खात्री देता येत नाही. किंबहुना स्वत:च्या जीवनाची साथ आपल्याला किती काळासाठी आहे,हे ही कुणी निश्चितपणे सांगू शकत नाही.जीवन फुलपाखरासारखे हाती आलेलं क्षणात हुलकावणी देऊन जाते.
              प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचा अंश आहे,त्यामुळे आपला काय नि परका काय यामध्ये भेदाभेद मुळीच नसावा.सर्वांमध्येच चांगल्या वाईट गुणांचे मिश्रण असते.आपण बोलताना सहजच कधीकधी बोलतो की,"कातडं एक असून चालत नाही,तर आतडंही एक असावं लागतं",पण या गोष्टी आज दुरापास्थ झालेल्या दिसून येत आहेत,कारण रक्ताच्या नात्यातील कधी परके होतात,तर कधी परकेही मनात घर करून जातात.हा सर्व निसर्गनिर्मित नव्हेतर मानवनिर्मित खेळ अनेकांच्या आयुष्यात चालूच असतो.जीवनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा होऊन गेला आहे.जीवन म्हणजे कुणासाठी आनंदाचे डोही आनंद तरंग,तर कुणासाठी जीवन म्हणजे दुःखाची सरिता,तहान भागवायला जातो आणि आजार पदरी येतो.परमेश्वराने दिलेल्या जीवनाचा सदसदविवेक बुद्धीने आपण किती सुयोग्य वापर करायचा किंवा ते धुळीस मिळवायचे,हे प्रत्येकाला जीवनात लाभलेली संगत,त्यानी वाचलेली पुस्तके,त्याचे विचार,आचार व संस्कार या सर्वांची सांगड तो किती यथायोग्य घालतो यावरूनच ठरत असते.
            परमेश्वराने दिलेल्या आयुष्यात सत्संगत,सद्विचार आणि समाजव्यवस्थेचा कणा असलेली माणुसकी,तसेच परस्परांबद्दल असलेला स्नेहभाव,आपुलकी यामध्ये वृद्धी करणे,हाच जीवनाचा प्राधान्य विचार असावा.जीवनात सदाचार आणि सदविचारांना खूप महत्त्व आहे,त्यांचा अंगीकार होणे महत्त्वाचे,नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला,अशी फसगत होऊन जाते.त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.विवेकाची कास धरून सन्मार्गाने चालणाऱ्यास सुरुवातीच्या काळात जरी जीवन त्रासदायक वाटत असले,तरी अंतिमतः ते नक्कीच सुखावह ठरते.उलटपर्ती दुष्ट,छल,कपट हे मार्ग सुरुवातीच्या काळात जरी मोहक दिसत असले,तरी ते अंतिम काळात मृगजळासारखे ठरतात.आपल्या हाती कधीच येत नाहीत.
        जीवनात नाव असे कमवा की,घेताक्षणी काम झाले पाहिजे किंवा काम तरी असे करा,की कुणाच्या ओळखीची गरजच पडली नाही पाहिजे.मनुष्याला जीवनात काय हवं आहे,ह्याचंच कोड ज्याला त्याला उलगडलेलं नाही.पैसा मिळवायला जातो,तर प्रेमाला पोरका होतो,अन् प्रेम मिळवतो तर पैसा दुरावतो.कधीकधी दोन्ही मिळवतो अन् मानसन्मान,प्रतिष्ठेसाठी झटू लागतो व समाधान गमावून बसतो.पैशाने ज्ञान कुणी वाढवू शकत नाही,पण निश्चितच ज्ञानाने पैसा वाढवू शकतो किंवा कमावलेल्या पैशाचा सदुपयोग करू शकतो.जीवनात तुम्ही किती पैसा कमावता, यापेक्षा त्याचा वापर कशा पद्धतीने करता,हे जास्त महत्त्वाचे आहे.
              नियोजन जीवनाचा मुख्य पैलू आहे,कारण त्याशिवाय जीवनाला दिशा प्राप्त होत नाही,नियोजनाशिवाय कार्य योग्यरीत्या पार पडणे फार कठीण आणि पडलेच तर पैसा,वेळ किंवा इतर काही गोष्टींचे त्याठिकाणी वाताहत झालेली दिसून येते.समुद्रात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे जीवनाला कुठे पोहोचायचे आहे, हेच कळू शकत नाही किंवा मार्ग सापडत नाही. मग ते एखाद्या वादळाच्या भयंकर तडाख्यात सापडून नेस्तनाबूत होते.जवळजवळ जीवन हे कापरासारखे आहे,असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,कारण जसा कापूर उघडा ठेवल्यानंतर काही वेळानंतर संपून जातो,तसेच जीवनात कर्तुत्व केले,किंवा नाही केले,तरीही जीवन हे संपणारच आहे,मग आपण कुटुंब,समाज आणि देश हितासाठी त्याचा वापर का करू नये?सत्कृत्य करून इतरांबरोबर स्वतःचा उद्धार करून घ्यावा.जीवन हे आईस्क्रीमप्रमाणे आहे,टेस्ट करा किंवा नका करू ते वितळून वेस्ट होणारच आहे.
              जीवनात स्वहित साधून आपण किती मोठे झालो हे जास्त महत्त्वाचे नसून,आपल्यासोबत किती जणांना घेऊन चाललो आहोत हे महत्त्वाचे.आपल्यामुळे किती जणांचे आयुष्य सन्मार्गी लागले हे महत्त्वाचे.स्वतः चालता चालता इतरांनाही सोबत घेऊन चालणे हा खरा निसर्गनियम अथवा मानवधर्म.निस्वार्थ भाव शिकावा तो प्राण्यांकडूनच,एखाद्या ठिकाणी खाण्यासाठी अन्नपाण्याचा थोडाजरी मागमूस लागला,तरी त्याठिकाणी प्राणी आपल्या सहकाऱ्यांनाही संकेत अथवा आवाजाद्वारे बोलावतात.अपवाद मात्र मनुष्यप्राणी आहे.परमेश्वराची पृथ्वीवरील सर्वोत्तम निर्मिती कुठली असेल तर ती म्हणजे मानव,परंतु मानवाने आज इतर प्राण्यांपेक्षाही स्वार्थ व धूर्तपणामध्ये उच्चांकी पातळी गाठली आहे.जीवनाचा खरा अर्थ स्वार्थात नसून दातृत्वात आहे,या विचाराची आज मानवाला भुरळ पडली आहे.
         जीवनात पैसा,संपत्ती सर्वकाही एकटेपणाच्या मोबदल्यात दिलं तर कितीजण होकार देतील आणि किती नकार देतील हे सांगणं फार कठीण.ऐश्वर्या धन-दौलत सर्व काही मुबलक असले तरी जीवनात एकटेपणा फार कठीण,त्यासारखे दुःख दुसरे कुठलेच असू शकत नाही.आधुनिक पण बुरसटलेल्या विचाराने ग्रासलेला समाज जो की पैसा हे सर्वस्व मानून बसला आहे,ते मित्र,दोस्त,नातलगांशिवाय काही दिवस राहीले,तर ते काही दिवसातच सर्वकाही देऊन फक्त आपल्या माणसांच्या सहवासाचीच अपेक्षा करतील.प्रेमाची भूक निर्जीव वस्तूंपेक्षा सजीवच पूर्ण करतात.निर्जीव वस्तूने तात्पुरतं समाधान मिळतं.परंतु जीवनभर समाधान सजीव वस्तूच्या सहवासातच आहे,हे विसरून चालणार नाही."पैसा है तो सब पूछते है कैसा है"ही म्हण समाजाने पुरेपूर आपलीशी केली असली तरी मनःशांती त्यामध्ये नाही.
       जीवनात आपल्या आवडीनुसार काम मिळणे खूप महत्त्वाचे,कारण त्यामुळे कामाची गतीच नव्हे,तर जीवनाची दिशाही बदलत जाते.नको असलेल्या कामाने नैराश्याचा पीळ सदैव मनाला रूतत राहतो.जीवन चाकोरीबद्ध नव्हे तर आकारबद्ध असावे.
         कलियुगात प्रत्येकजण भुकेलेला आहे तो प्रेमासाठी.पद,पैसा,प्रतिष्ठा ह्या गोष्टी कितीही मिळवल्या तरी शेवटी समाधान नाही,प्रेमाची भूक ही अतृप्तच राहते.प्रेमाने एखाद्याची चौकशी केली,पाठीवरून हात फिरवला,आपलेपणा दाखवला तर,यापेक्षा आणखी समाजाला तरी काय अपेक्षित आहे.पैसा कमवाच,इतरांना फक्त प्रेम द्या,तेच पुष्कळ आहे,आपलेपणा निर्माण करण्यासाठी.पैशाने माणसंजवळ येतील मात्र प्रेमाची असतीलच असे नाही.स्वार्थापोटी जवळ आलेल्या माणसांचे काम झाल्यावर ती नक्कीच आपल्यापासून दुरावतात,परंतु प्रेमाने जवळ आलेल्या माणसांची नाळ सदैव आपल्या हृदयाशी जोडली जाते.निस्वार्थ भावनेतून जोडलेल्या दोन मनांना फक्त एकमेकांचे प्रेम, आधार आणि सहवासाची उभ हवी असते,हेच तर खरे जीवन.


           लेखक,
    श्री.अजिनाथ सासवडे (सर),
    मु.पो.लोणी(स),ता.आष्टी,
    मो.९४२१३३६०५९

Sunday, January 12, 2020

दुष्काळाच्या झळा

मराठी "लेख"संग्रह 👈 येथे टच करू नका.

शेतकऱ्याचा मुलगा म्हणून स्वत्वाच्या आंतरिक शक्तीचे आणि ज्ञानाचे उपयोजन करून "दुष्काळाच्या झळा"या लेखाचा उदय नि छावणी चालकांस झणझणीत अंजन....

"दुष्काळाच्या झळा"

मातीचा टिळा माथ्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या माझ्या शेतकरी राजाला "दुष्काळ" हा शब्द उच्चारला की काळीज पिळवटून टाकल्यासारखं होतं.घोटभर पाण्यासाठी वणवण फिरणारे बायका,माणसं,पोरं अन मुठभर चार्‍यासाठी सारा शिवार पालथा घालणारा कष्टकरी,शेतकरी हे विदारक चित्र दुष्काळ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
        समाजव्यवस्थेच्या आणि देशाच्याही अर्थव्यवस्थेचा मुळ आधार असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनाची ससेहोलपट कुठवर चालणार हे न उलगडलेले कोडेच आहे.दुष्काळात शेतकरी किती घायकुतीला येतो हे सांगताना शब्दांनाही सुकेपणा जाणवतो.गावात लोकांना एक हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल वणवण भटकत राहावे लागते.झोपेतून उठल्यानंतर कुठे पाणी मिळेल हा पहिला प्रश्न तोंडापुढे आ वासून उभा राहतो.सर्वांच्या ध्यानीमनी एकच विचार कुणाच्या विहीरीवर पाणी मिळेल,कुणाच्या बोअरवेलला पाणी आहे.हीच चर्चा रंग धरून असते.अष्टोप्रहर पाणी आणने हाच मोठा उद्योग.काल अंघोळ केली आज करावी की नाही,हाच विचार मनात घोळसा करू लागतो,की नुसतेच ओल्या फडक्याने अंग पुसून घ्यावे या विचाराने मन बेचैन होते.गावात कुठे हातपंप असेल तर तिथे भांड्याच्या लांबच लांब रांगा दिसतात.तेथेही दहा-वीस वेळा हापसल्यावर कुठं चुळकाभर पाणी येतयं.त्यातही पाणी कमी आणि भांडणाला जास्त उभारी हेच चित्र पहावयास मिळते.
      कुणी सायकलवरून,कुणी गाडीवर तर कुणी डोईवर दुरदुर जाऊन पाण्याची आपली तहान भागविण्यासाठी वणवण भटकतात आणि मिळेल ते गढूळ,काळे-निळे जशा रंगाचे मिळेल तसे पाणी घेऊन येतात.व आपला सुकलेला घसा ओला करतात.जनावरांही पचनी पडणार नाही ते पाणी माणसं घटाघटा पितात.काय करणार बिचारी निसर्ग कोपला आणि सरकारही.गटारीतील पाणी प्या नाहीतर नालीतील प्या सरकारला काही सोयरसुतक नाही.ते आपले गडगंज होऊन राहिले.ज्याच्या विहीरीला बोअरवेलला थोडेफार पाणी तोही त्याचे दोन रूपये करून स्वतःच्या खिशात कसे घालता येतील याच विचारात.शंभर रूपयाला एक दोनशे लिटरचे पिंप विकले जाते.ज्याला भाकरीचीच चिंता तो  पाणी विकत घेऊन कसे पिणार हा मोठा प्रश्न आहे.
    पाणी दुरून कुठून तरी आणता येईल पण ज्याच्या जिवावर माझ्या शेतकरी राजाचं पोट भरतं त्या जनावरांच्या काय व्यथा आहे.न पोटाला पोटभर चारा न पियाला पाणी.अशातच शेतकरी संघटना,राजकीय नेते,पुढारी झोपलेल्या सरकारला उठवतात नि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था म्हणून चाराडेपो,छावणी किंवा अन्य काहीतरी सोय करा मायबाप ही चर्चा जोर धरू लागते.अशातच छावण्यांना परवानगी मिळाली ही बातमी ऐकून शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहीला नाही.जणू भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकत राहावे आणि तितक्यात थंडगार पाण्याने भरलेली घागर दिसावी.
    छावणी सुरू होणार,चारा छावणी सुरू होणार ह्या बातमीने चैत्राच्या उन्हात अनवाणी चालणाऱ्या वाटसरूला एखाद्या गाडीवाणाने गाडीवर बसून न्यावे अशाप्रकारचे सुख होते.शेतकऱ्यांची लगबग सुरू होते.कुणी बांबू आणतात तर कुणी लाकडाच्या मोठमोठ्या मेखा तयार करतो,कुणी मेडी तोडू लागतो.प्रत्येकाला घाई की चांगली चारा डेपो जवळची जागा मिळावी.त्यामुळे जास्त लांब चारा वाहून नेण्याचा त्रास होणार नाही.तर काहींच्या मनात रात्रीचा गुपचूप चारा आणता येईल.सर्वांच्या छावण्या ऐटीत उभ्या राहू लागतात.कोण स्वतः ला झोपण्यासाठी कोपी तयार करतयं तर कोण जनावरांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी कापड कागद बांधतयं.कोणी जमीनीवर पालापाचोळा ठेवून त्यावर टाकी मांडतोय तर कुणी दोन लाकडे आडवे टाकून दावण तयार करतोय,सर्व सर्व लगीन घाई जणू छावणी चालकाचे लगीन हाय अन ही सर्व वऱ्हाडी मंडळी.सूर्य कुठं आहे हे सूर्यफुलाला कुणी सांगतं काय?त्याप्रमाणे छावणी कुठे आहे हे कुण्या शेतकऱ्याला सांगायची गरज पडत नाही.
    नारळ फोडून छावणीचे उदघाटन होते.सर्व शेतकऱ्यांना उद्देशून छावणी चालक भाषण सुरू करतात.सर्वांगाचा कान करून खजीलपणे शेतकरी ऐकू लागतात.भाषणात सर्व आश्वासनांचा पाडा वाचून झाल्यावर चालक महाशय आपल्या अलिशान गाडीत बसून संपूर्ण छावणीतून एक चक्कर मारतात नी सगळीकडे धूरळा उडवत निघून जातात.छावणी सुरू होते.सर्व शेतकरी आनंदात गप्पागोष्टी करू लागतात.जेमतेम आठ-दहा दिवस दिल्या भाषणाला चालक महाशय जागतात आणि कलियुगात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे हे दाखवण्यास सुरुवात करतात.कधी अर्धा चारा तर कधी एक दिवसाआड हे सत्र सुरू होते.शेतकऱ्यांनीही"पदरी पडले धोंड अन हसून केले गोड"याप्रमाणे जे मिळेल त्यात समाधान मानले.जनावरांना वेळीअवेळी चारा मिळू लागला.आज चारा मिळाला नाही,तर आज कमीच मिळाला हेच चालकाचे षडयंत्र सुरू झाले.जनावरांना कधी मिनरल मिक्स पावडर नाही.कधी संतुलित आहार नाही.फक्त आणि फक्त ऊस त्यामुळे लदलद जनावरेही अगदी रोडकी होऊन जोराच्या वार्‍यात जमीनीवर पडतील की काय या काळजीने शेतकऱ्यांना भिनभिनल्या सारखे व्हायचे.कितीतरी शेतकऱ्यांचे रोज एक ना अनेक डोरं पुरेशा चार्‍याअभावी घायाळ होऊन गतप्राण होत असे.लाळखुरकत,बुळकुंड्या होऊन जनावरे थकून जागीच बसत.जनावरांना मोकळे सोडले तरीसुद्धा ती पळत नसे,त्यांच्या पायाला मोठमोठे दगड बांधल्यागत ती जडपावलांनी चालत असे.शेतकरी बिचारा हवालदिल होऊन शून्य नजरेतून आपल्या जनावरांकडे पाहत असे.चारा कधी येतोय अन कधी मिळतोय हाच प्रत्येकाच्या जीवाला घोर लागून राहायचा.कधी एखादी गाडी वाजली तर तडफडून उठून बिटीबिटी डोळ्याने चार्‍याची गाडी हाय का ते पाहू लागे.जनावरांना वेळेवर चारा पाणी नाय मिळाला तर ते कसे काय जगायचे,या विचाराच्या डोहात शेतकरी बुडून जात.जनावरांच्या शिवाय कशी कुणबीक करणार नी कसा संसाराचा गाडा चालवणार या विचाराने शेतकऱ्यांच्या काळजाला कपार पडल्यासारखं व्हायचं.जनावरे हेच शेतकऱ्यांच्या संसाराचे खांब असतात.हे शेतकरी स्वतःच्याच मनाला सांगत असे.
         छावणीत बसल्या बसल्या दुपारी लोकांच्या गप्पांना फार उधाण येत असे.पूर्वीच्या काळी पाऊस पाणी भरपूर व्हायचे,भर उन्हाळ्यात सगळीकडे पाणी असायचे.आता दुनियाच बिघडली आहे.झाडांची बेसुमार कत्तल,यांत्रिकीकरण,वेगवेगळे उद्योगधंदे यामुळे पाण्याचा जास्त अपव्यय होतो.त्यामुळे आपल्यावर वाईट दिवस येत आहेत.असे काही मंडळी आपले मत व्यक्त करत.अगदी डोंगर माथ्यावर पाईपलाईनद्वारे पाणी उपसा करून पाण्याचा साठा संपविण्यासाठी जशी काही स्पर्धा लावली आहे असेच प्रत्येक जण वागतो आहे.हेही गप्पामध्ये मुद्दे येतात.कळतं पण वळत नाही,त्यातलेच हे सर्व महाभाग कारण पाण्याचा टँकर दिसला की आर्धीटाकी हेच खाली रिचवतात.अन पुन्हा टँकरपुढे हात पसरून उभे.विहीरी,बोअरवेलमुळे पाण्याची पातळी खोल जाते,हे सांगणारेच बोर घेण्यासाठी उतावळे झालेले.काहींना पाण्याचे महत्त्व समजते.आपण पाण्याचा आदर करावा.थेंबानथेंबाचा योग्य वापर करावा.असे केले तरच आपण जगू शकतो.तांब्याभर पाणी पिण्यासाठी घेऊन अर्धा टाकून देण्याचे दिवस आज नाहीत.'जल है तो कल है'असेच आपल्याला म्हणावे लागेल.ह्या सर्व चर्चा रंगलेल्या असतानाच ट्रकचा हाॅर्न कानावर पडतो न पडतो तोच सर्वांची पळापळ सुरू होई.ऊसाच्या गाड्या आल्या आता चारा मिळेल हे समाधान सर्वांच्या डोळ्यात तरळू लागे.
         सायंकाळ झाली की घरी जावे की इथेच छावणीत झोपावे हाच विचार प्रत्येकाच्या मनात घर करु लागतो.घरी जावे तर रात्रीला मोकाट कुत्र्यांचा त्रास.कधी येतील अन जनावरांना तोडतील भरवसा नाय.त्यांच्या तोंडाला मांस लागलय त्यामुळे ते जिवंत जनावरांना खायला बी मागेपुढे पाहणार नाहीत.छावणीत रोडकी जनावरे,वासरे मेली की जवळच टाकतात.ती खाऊन कुत्रे गलेलठ्ठ होतात.जनावरांच्या मरणात कुत्र्यांचे जगणे आहे हे बाकी खरे!रात्रभर कुत्रे आजूबाजूला विव्हळत बसतात.मेलेल्या जनावरांचा उग्रवास छावणीत नीटशी झोप लागू देत नाही.इथेच झोपावे तर बायको,पोरं रस्त्याकडे टक लावून अधीरतेने वाट पाहतात.जेष्ठातील शेतकरी जशी आपली नजर आभाळाला खिळून ठेवतो तसे.घरी गेल्यावर गरमागरम खायला मिळेल.तसं इथं जे शिळंपाकं हाय तेच गोड मानून घशाआड करावं लागल.सायंकाळी घरी गेल्यावर दिवसभराच्या सार्‍या शल्यांचा एका क्षणात विसर पडतो.आपल्या मुलांचा स्पर्श जणू त्या दुष्काळात शेतकऱ्यांना संजीवनी सारखा वाटू लागतो.
           पैशाची ऊब नसली,की शेतकऱ्यांच्या जीवनावर एक प्रकारची प्रेतकळा येते.हेच चित्र दुष्काळ आणि छावणीच्या काळात शेतकऱ्यांच्या जीवनात पाहावयास मिळते.शेतकऱ्यांच्या जवळ कायमचा पाण्याचा एकमेव साठा म्हणजे त्याचे अश्रू,हेच अश्रूरूपी पाणी त्याचे दुःख धुवून टाकण्याचा प्रयत्न करते.परमेश्वराने हे पाणी तरी त्याच्याजवळ ठेवले आहे हे त्याचे उपकारच म्हणा.दुष्काळात व छावणीच्या काळात हेच अश्रू शेतकऱ्यांच्या जीवनरूपी अंगावर कायम अभिषेक करत राहतात.....!

                    लेखक,
            श्री.अजिनाथ सासवडे(सर)
             मु.पो.लोणी(स.),आष्टी
             मो.९४२१३३६०५९

Monday, January 6, 2020

रौद्र शंभुराजे

"रौद्र शंभुराजे"

१४ मे१६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचा छावा संभाजीने जीवनाचा पहिला श्वास घेतला.ज्याच्या कुंडलीतच पहिल्या श्वासापासून संघर्ष व स्वकीयांकडून फसवणूक लिहिली आहे त्याला कसली आलीय जीवन मरणाची भीती.संभाजी राजांचे दुधी दातही उमलले नव्हते तेव्हाच मायेचा व दुधाचा पाझर आटला नि महाराणी सईबाई सारखी जन्मदात्री अनंतात विलीन झाली,पण संघर्ष व झुंज देत नाही तो छावा कसला.धाराऊ सारख्या पर मातेच्या दुधावर पोलादी शरीराची उभारणी करणाऱ्या या छाव्यात बुद्धी व शक्तीचा अजोड संगम होता.सह्याद्रीच्या मावळ मुलखात,जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणार्‍या संभाजी राजांचा दरारा पाहून मुघलांना सळो की पळो झाले होते.
        राजमाता जिजाऊंचे स्वराज्याचे गोमटे स्वप्न ज्या शिवरायांनी सत्यामध्ये उतरवलं,त्याचा वारसा लाभलेले संभाजी स्वातंत्र्याची मशाल कशी विजू देतील.जगाच्या पाठीवर सलग १२० लढाया जिंकणारा व एकदाही पराभूत न झालेला राजा म्हणून इतिहासाने ज्यांची नोंद घेतली ते राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिमानाने उल्लेख केला जातो.वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम्,सातशतक सारखें ग्रंथ संभाजी राजांनी लिहिले.एक नव्हे तर तब्बल १४ भाषा संभाजी राजांना बोलता येत होत्या.छत्रपती शिवाजी महाराज हे एक सिंहपुरुष होते,परंतु राजे संभाजी हेही एक छावाच होते,हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड हिंदुस्तानला नव्याने पण पुरेपूर उमजलं आहे.
        एकाच वेळी पाच आघाड्या विरुद्ध जिकिरीची पंजेफाड करणारा सेना-धुरंदर मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेले.तीस लाखांची फौज घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला बलाढ्य औरंगजेब,मुंबईचे टोपीकर,गोव्याचे फिरंगी,जंजिऱ्याचे सिद्दी या चार आघाड्या आणि पाचवी आघाडी होती विखारी विश्वासघातक्यांची स्वार्थांध स्वकीयांची,अगदी घरच्यांचीच.पाठीची ढाल व हाताची तलवार करून सर्वांबरोबर वादळासारखा सतत नऊ वर्ष झुंजत राहणारा राजा म्हणजे रौद्ररुपी संभाजीच होय.संभाजी राजे फितूर,स्वराज्यद्रोही दिलेरखानाला जाऊन मिळाले,अशा बाजार गप्पा उठवल्या जाऊ लागल्या;अरे ही तर शिवरायांची चाल आदिलशाही व मोगल यांच्यात हातमिळवणी झाली तर ते आपल्याला घातक ठरेल या दूरदृष्टीने शिवरायांनीच संभाजी राजांना दिलेरखानाच्या गोटात पाठवले होते.ज्याचा जन्मच रयतेच्या रक्षणार्थ झाला त्याने रयतेची लूट,अत्याचार निमुटपणे सहन करावी,हे कदापी शक्य नव्हते,'छातीतील धग व मनगटातील रग' याच्या जीवावर अवघे स्वातंत्र्य ९ वर्ष पेलून धरणारा मराठ्यांचा महाप्रतापी राजा म्हणजे शंभुछत्रपती.प्रभू रामचंद्राच्या रघुकुल वंशाचा वारसा सांगणारा मिर्झाराजे जयसिंग सारखा मोगलाची लाचारी पत्करलेला रजपूत अवघ्या दहा-बारा वर्षे वयाचे असताना संभाजीराजांनी बुद्धिबळात मात दिल्यानंतर मूर्च्छित होऊन म्हणतो,"संभा का दिमाग है या दौडता घोडा", एवढ्या कमी वयात एवढी बेडर नजर,काळजाची निशाणी साधणारे बोल,थोरा-मोठ्यांसाठी असलेली अदब मिर्झाराजानी आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती.अशी अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले राजे म्हणजे शिवपुत्र संभाजी.
          शंभू राजांचा चेहेरा पोतासारखा उजळलेला.राजांची शरीरयष्ठी निखार्‍यावर फुलल्या भाकरीगत डौलदार व रसरशीत अशीच होती.त्यांच्या पहाडी आवाजाने तर अवघा मुलुख ढाण्यावाघाच्या डरकाळीने गुंजावा तसा गुंजत असे.गळ्यात ६४ कवड्यांची माळ जनु साक्षात जगदंबेने त्यांच्या गळ्यात घातली होती,एवढा त्या माळेचा गवगवा होता.कपाळावरील शिवगंध तर पिता शिवरायांची निशाणीच होती.संभाजी राजांच्या सहधर्मचारिणी येसूबाई व दुर्गाबाई यांचाही स्वराज्यात चांगलाच मरातब होता.संभाजी राजांचा पांढराशुभ्र 'चंद्रावत' नावाचा घोडा फारच अबलक होता.
    शिवसूर्याच्या अस्तानंतर नऊ महिन्यांनी,१६ जानेवारी १६८१ रोजी स्वराज्याला दुसरे छत्रपती लाभले शंभूसूर्य.रायगडावरील तोफांच्या कडाडत्या बत्त्या टोपीकर,सिद्धी,फिरंगी,मोगल व कुतुब ह्या सर्व शाह्यांना जणू गर्जुन सांगत होत्या;मराठी दौलतीच्या सिंहासनावरील 'शिव' गेला तरी त्या आसनावर आता 'रुद्र' आला आहे.जरीपटका पुन्हा एकदा डौलाने फडकू लागला. संभाजीराजांच्या रूपाने स्वराज्याला एक तापता सूर्यच मिळाला होता आणि याला जो गवसणी घालेल त्याची राख होणार हे निश्चित होते.रयतेच्या रक्षणासाठी संभाजी राजांनी उभे आयुष्य बहाल केले,तसे रयतेतील एकेक मावळासुद्धा संभाजीराजांच्या एका शब्दाखातर आपलं काळीज त्यांच्या चरणी अर्पण करण्यास तयार होता.शिवरायांच्या जंजिरा या अधूऱ्या स्वप्नाचा सल,शंभूराजांनी पूर्ण करण्यासाठी बेधडक पावले उचलली.काही तासातच सिद्दी कासम व सिद्दी खैरात यांना जंजिऱ्यावरून पळ काढावा लागला.जंजिऱ्याजवळील असंख्य जललहरींनी जंजिरा स्वराज्यात आल्यामुळे छत्रपतींना माना उंचावून मुजरा केल्या.संभाजी राजांची युद्धनीती,न्यायनीती,चाणाक्ष बुद्धी व गनिमावर असलेली तीक्ष्ण नजर हीच गोष्ट रयतेला राजांच्या मोह बंधनात बांधून ठेवत होती. हिंदू धर्म व मायभूमीच्या रक्षणार्थ राजांसह मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक या मातीत करून धर्माचे व धरणीमातेचे रक्षण केले.म्हणून तर आजही आपल्या मातीचा रंग लाल आहे.
          दुर्बलांच्या हक्कांचे संरक्षण करणे हेच खरे "राजेपण"असा कातर विचार राजांच्या मनाला नेहमीच स्पर्श करत असे."मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा"हे समर्थांचे बोल राजांच्या कानात सदैव गुंजत होते.राजांनी धर्मरक्षणासाठी नेटाने प्रयत्न केले,पण शेवटी घडू नये तेच घडले,औरंगजेबाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्या मुकर्रबखानाने संगमेश्वराजवळ संभाजी राजांना कवी कलशांसह जेरबंद केले.तेथून राजांना अकलूज येथील औरंगजेबाच्या छावणीत घाईघाईने हलवण्यात आले.मावळ्यांचाही इस्लाम कबूल न केल्यामुळे तेथेच शिरच्छेद करण्यात आला.अकलूज वरून पुन्हा राजांना भीमा-इंद्रायणीच्या काठावर वसलेले वढु(बु)-तुळापूर येथे आणण्यात आले.चाळीस दिवस औरंगजेबाच्या अन्याय,अत्याचाराला भीक न घालता स्वराज्य व स्वधर्मासाठी जिवंतपणी स्वतःच्या मरणाला शंभुराजे रोज निधड्या छातीने सामोरे जात होते.अंगाची कातडी सोलली,जीभ कापली,डोळे काढले तरी धर्मवीर संभाजीराजे ना झुकले ना नमले.धर्मासाठीच मरायचं नि धर्मासाठीच जगायचं हा दृढनिश्चय ज्याच्या ठायी वसलेला,त्याला कसली आली मरणाची भीती.अरे मरणालाही मरणाची भीती वाटावी एवढी क्रुरशिक्षा शंभुराजांना दिली पण जीवाची भीक मागितली नाही,की दयेची याचना केली नाही.११ मार्च १६८९,फाल्गुन वद्य अमावस्याच्या दिवशी 'जगदंब-जगदंब' हे अखेरचे बोल मनी उच्चारून शंभुसूर्याचा अस्त झाला.शंभुराजे गेले पण सर्वांना सांगत गेले,अरे मातीत मरणारे कैक असतात,पण मातीसाठी मरणारे फक्त "मराठे"असतात.
        आपण सदैव शंभुविचार व आचारांना स्मरणात ठेवावे. नुसतेच राजे आमचे म्हणून चालणार नाही,तर जीवनात शंभुराजांच्या ठायी असलेले गुण आपण आचरणात आणले तर शंभुराजांना तेच विनम्र अभिवादन ठरेल.

महत्वाची टीप: हृदय हेलावून टाकणारे लेख,कथा वाचण्यासाठी कृपया http://ajinathsaswade.blogspot.com
या लिंकला भेट द्या.
                      लेखक,
              श्री.अजिनाथ सासवडे (सर)
               मु.पो.लोणी(स), आष्टी
               मो.९४२१३३६०५९

Thursday, January 2, 2020

बाप

वाचक मित्रांना सांगू इच्छितो की,"बाप"या लेखात मी दर्शवलेला बाप हा ग्रामीण भागातील आहे.त्यामुळे वडलांपेक्षा ग्रामीण भागातील प्रचलित बाप हाच शब्द मला योग्य वाटला."बाप"या एकेरी नावात जो दबदबा आहे तो मी माझ्या अल्पशा बुद्धिनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

"बाप"                                               

        "बाप या शब्दातच एवढा धाक आहे"की,नुसता उच्चारला तरी,भल्याभल्यांना धडकी भरते.बापाएवढा दरारा बाप सोडता भूतलावर कुणाचाही नाही.आजतागायत आईबद्दल लिहिण्यासाठी भरपूर कवी,लेखक,साहित्यिक सरसावले,परंतू बाप मात्र या सर्वांच्या शब्दांना जवळ जवळ पोरकाच ठरल्यासारखा आहे."स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"हे वाक्य अगदी सान-थोरांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे,पण स्वामी तिन्ही जगाचा बापाविना....काय?आईला लेखक,कवींकडे पुरेपूर न्याय मिळाला व ति धन्य पावली,पण बापाच काय?बापाचा थोरपणा,मोठेपणा सांगण्यास का कुणास ठाऊक लेखक,कवींचे मन लवकर धजावत नाही.बाप सर्व ठिकाणी उपेक्षित घटकांसारखा का ठरावा?हा मोठा प्रश्न मनाला चिरत जातो.आई सावलीसारखी आहे पण बाप झाडासारखा आहे. ऊन,वारा,वादळ यांचा सर्व त्रास झाडालाच सहन करावा लागतो.वरवर पाहता बाप नारळासारखा कठीण वाटत असला तरी,आतून बापाचे हृदय नारळाप्रमाणेच मुलायम असते.छोट्या छोट्या संकटाच्या प्रसंगी आपण'अग आई' म्हणून आईची आठवण काढतो,परंतु मोठे संकट आल्यावर आपसूकच तोंडातून "बापरे"हा शब्द केव्हा बाहेर पडतो हे स्वतःलाही उमगत नाही.यावरून मोठ्या संकटात बापच आपल्याला तारू शकतो हे ध्यानी येते.प्रत्येकासाठी स्वतःचा बाप संकट मोचनासारखा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.
          बापासारखा उत्तम सल्लागार जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही.मुलांच्या भल्यासाठी बाप कठोरपणा अंगीकारतो.बाप हयात नसल्यावर मुलांची अवस्था दिशाहीन जहाजासारखी होते.वारा घेऊन जाईल तिकडे जहाजाप्रमाणे वाहत जातात.आई भावना व वात्सल्याची देवी आहे,पण बाप मात्र कर्तव्य व जबाबदारीचा देवता आहे.मुलांना काही कमी पडल्यावर समाज बापाच्याच गळ्याभोवती फास आवळतो.चंदनाप्रमाणे स्वतः झिजून आपल्या मुलांच्या भाळी आनंद निर्माण करण्याचे काम बापच करतो.स्वतःच्या सुखापेक्षा आपल्या कुटुंबाचे सुख हे बापासाठी एक पर्वणीच असते. दुःखाने कितीही विषाद मांडला तरी,त्याला कणखरपणे हसत मुखाने बापच सामोरे जातो.दुःखाच्या सागरात कितीही बुडाला तरी बाप धाय मोकलून रडू शकत नाही.समाज त्याला तशी स्वाधीनता देत नाही.दुःखाच्या प्रसंगी कधीतरी बापाची उशी रात्री चाचपून पहा नक्कीच ती अश्रूंनी ओली झालेली जाणवेल,कारण बाप आपल्या अश्रूंना अंधारात,एकांतात वाट मोकळी करून देत असतो.तो हताश किंवा हतबल नसतो तर,कर्तव्याने बांधलेला असतो.कर्तव्याच्या,जबाबदारीच्या व दुःखाच्या झळा बापाला अगदी मुकाटपणे सोसाव्या लागतात.
        देवाने आपल्या नशिबात काय लिहिले आहे,हे कोणी सांगू शकत नाही,पण आपला बाप स्वतःच्या घामाच्या शाईने आपले भविष्य लिहित असतो.मुलांच्या भविष्याचे मनोरे उभारताना बापाला होत असलेल्या यातनांचा कल्लोळ कोणाला दिसत नाही.झाडावर चढल्यावर फळे चाखण्याच्या आनंदात आपल्याला स्वतःच्या खांद्यावर बसून ज्याने झाडावर पावते केले,त्या बापालाच आपण विस्मरून जातो.माघारी परतताना पुन्हा बापाचीच आठवण येते. बापाची आठवण दुःखात होते,परंतु आनंद लहरीत होत नाही.परीक्षेत घवघवीत यश मिळविले,नौकरी लागली तर, पेढ्याचा पहिला घास आपण आईला भरवतो.पण पुस्तकांसाठी लागणारा खर्च,शाळेची फी,गणवेश हे सर्व मागताक्षणी देणारा दुःखी,कष्टी बाप आपल्याला आठवत नाही.बाप लढवय्यासाठी ढाल आहे,उन्हातल्यासाठी सावली आहे,वाहत जाणाऱ्यासाठी आधार आहे,तर भुकेलेल्यासाठी अन्नाचा घास आहे. बाप हा बाप असतो,त्याची सर जगात कुणाला येणार नाही.बापाच्या वस्तूवर मुलं जेवढा हक्क गाजवतात तेवढा हक्क कुठेच गाजवू शकत नाहीत.मग ती बापाची"मांडी असो अथवा भांडी".
    मुले लहान असताना बापाने खाऊ आणावा आणि स्वतःला भूक नाही असे सांगून सर्व मुलांच्या मुखी घालावा,हे फक्त बापाचच काळीज करू शकते.मुलांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर सरून सुखाची वहिवाट,यावी त्याकरिता फाटका सदरा व तुटकी चप्पल वापरून बाप एक एक दिवस मावळतीला नेत असतो.दिवाळीच्या सणाला घरातील सर्वांना नवे कपडे खरेदी करून आणणारा बाप स्वतः मात्र जुनेच कपडे परिधान करतो.स्वतःचा जीव गहाण ठेवीन,पण मुलांना काही उणीव भासू देणार नाही,तो बापच असतो.मुलीच्या लग्नात आईला भरगच्च मानपान;बाप मात्र दवाखान्यातील पेशंट सारखा उसने हासू चेहर्‍यावर दाखवत,मंडपदारी केविलवाणी उभा असतो.मनात सल असतो की,माझा काळजाचा तुकडा सुखात तर राहील ना?अशा असंख्य विचारांचे काहूर मनी दडपून ठेवतो अन मुलीला जड अंतःकरणाने सासरी पाठवतो.
        समईतील वातीप्रमाणे स्वतः झिजून मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा बाप,मुलांच्या आठवणीत राहील की नाही,हा मात्र यक्ष प्रश्न आहे.ज्याने मुलांसाठी आपल्या आयुष्याचा होम करून त्यामध्ये स्वतःच्या इच्छा,आकांक्षाची समिधा म्हणून आहुती दिली,त्या बापाला मुलं मोठी झाल्यावर किती सन्मानाची,आदराची वागणूक देतात,का त्याची कुचेष्टा करतात हाही प्रश्न काळजात घर करतो.
        "बाप म्हणजे नुसता डोक्याला ताप"असे काही कुपुत्र मोठी झाल्यावर बापाची समाजात अवहेलना करतात.बापाचा विच्छाद मांडतात.उपकाराची जाणीव न ठेवता कृतघ्नतेचा पाढा वाचतात.मुलांच्या आजारपणात ज्या बापाने रात्र रात्र पापणीला पापणी भिडू दिली नाही,त्याच बापाच्या कृश काळात मुलांना त्यांच्या प्रकृतीकडे कटाक्ष टाकायलाही अवकाश नाही.बसने अथवा रिक्षाने दवाखान्यात जाऊन या,असा निर्भयपणे सल्ला देण्यासही त्यांचे मन कच खात नाही.ही आपल्याच फांदीला अगळीवेगळी कुसंस्काराची फळे कशी लगडली हे बापालाही समजत नाही.
        आई-बापावर नितांत प्रेम करा.ते गेले तर प्रेमाचा अथांग सागर आटला म्हणून समजा.त्यांच्या सेवेशिवाय प्रत्येकासाठी स्वर्गाची कल्पना बिलकुल धूसर.कितीही डगमगती परिस्थिती असुद्या,पण बापाची मान आपल्या कार्यामुळे कधीही झुकणार नाही हेच सदैव ध्यानी ठेवा.बापाच्या पैशावर कसला आलाय रूबाब,पैसा आपला अन रूबाब बापाने केला पाहिजे;तर कुठं आपलं नि"बापाच"नाव झाल म्हणून समजा........

        श्री.अजिनाथ सासवडे(सर)
        मु.पो.लोणी(स.)आष्टी
          ९४२१३३६०५९

कथा - मेटे मामा

    *कथा*                *मेटे मामा* *लेखक- अजिनाथ सासवडे*                      मेटे मामा खरंतर आमच्या वडिलांचा मामा. पण आम्ही लहान-मोठे सगळ...